नाशिकमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीत गिरीश महाजनांनी केलं ढोलवादन

174

नाशिक शहरातील भद्रकाली येथील वाकडी बारव येथून गणपती विसर्जन रथ मिरवणूकीची ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण व क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत आज, शुक्रवारी ढोल, ताशांच्या निनादात उत्साहात सुरूवात झाली. मिरवणुकीत अग्रस्थानी नाशिक महानगरपालिकेचा शासकीय मानाच्या गणपतीसह शहरातील 23 गणपती मंडळांनी सहभाग नोंदविला. यावेळी गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला.

उत्सवात दाखल गुन्हे शासनाकडून मागे

यावेळी मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, गणेशोत्सव व दहिहंडी सारख्या उत्सवांमध्ये दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे महाराष्ट्र शासनाने मागे घेतले आहेत. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे गणपती उत्सव साजरा करता आला नाही त्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात आपण सर्वजण गणेशोत्सव मोठ्या जोषात व उत्साहात साजरा करीत आहोत. सायंकाळी पावसाच्या अंदाजाने मिरवणूक लवकरात लवकर पुढे नेऊन निर्विघ्नपणे पार पाडावी, असे आवाहन यावेळी मंत्री गिरिश महाजन यांनी गणेश मंडळांना केले.

स्वत: ढोल वाजवत केला प्रारंभ

सुरवातीला महापालिकेच्या शासकीय मानाच्या गणपतीची विधिवत पूजा करून आरती करण्यात आली. त्यानंतर थेट मिरवणूकीत सहभागी होवून मंत्री गिरीश महाजन यांनी स्वत: ढोल वाजवून मिरवणूकीस प्रारंभ केला. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया’ असा गजर करून विसर्जन मिरवणूकीत सहभागी झालेल्या गणेश मंडळाच्या रथांना मंत्री गिरीश महाजन यांनी शुभेच्छा दिल्या. त्यासोबतच मिरवणूक कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून शांततेत पार पाडण्याचे आवाहनही मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थितांना केले.

(हेही वाचा – महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर भारतात ‘या’ दिवशी एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा)

यावेळी आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, पोलीस महानिरिक्षक बी.जी.शेखर पाटील ,नाशिक शहर पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी आवेश पलोड, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे यांच्यासह शहरातीत विसर्जन मिरवणूकीसाठी सहभागी गणेश मंडळाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.