माहिम, दादर शिवाजीपार्क ‘भगवे’मय! ‘मनसे’ची झेंडेबाजी

145

श्री गणरायांना अनंत चतुर्दशीच्या दिवशी भक्तांकडून निरोप दिला जात असल्याने यादिवशी मोठ्याप्रमाणात गणेश मूर्तींचे विसर्जन पार पडते. मुंबईची मध्यवर्ती ठिकाण असलेले माहिम, दादर आणि शिवाजीपार्क याठिकाणी गिरगावपाठोपाठ मोठ्याप्रमाणात विसर्जन केले जात असल्याने याठिकाणी मोठ्याप्रमाणात विविध राजकीय पक्षांकडून तसेच संस्थांकडून पाणी, सरबत तसेच इतर खाऊंच्या वाटपांचे मंडप उभारले आहे. मात्र, येत्या दसरा मेळाव्याकरता शिवाजीपार्क कुणाचे यावरून शिवसेनेच्या उध्दव ठाकरे आणि शिंदे गटांमध्ये वाद सुरु असतानाच शिवसेनेच्या या बालेकिल्ल्यांमध्ये मनसेने जोरदार झेंडेबाजी करत अवघा दादर, शिवाजीपार्कचा परिसर भगवामय करून टाकला आहे.

(हेही वाचा- महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर भारतात ‘या’ दिवशी एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा)

शिवसेनेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र गट स्थापन करत राज्यात भाजपसोबत युती करत सरकार स्थापन केले. या शिंदे गटामध्ये दादर-माहिमचे आमदार सदा सरवणकर यांनी प्रवेश केल्याने शिवसेनेच्या बालेकिल्ल्यावर शिंदे गटानेच दावा केला आहे. त्यामुळे या विभागात उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेने प्राबल्य असले तरी शिंदे गटाचे वर्चस्व अधिक निर्माण करण्यावर भर दिला जात असून या गणेशोत्सवामध्ये ठिकठिकाणी प्रवेशाद्वाराच्या कमानी शिवसेना शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर आणि माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांनी उभारल्या. दादर-माहिममधील शिवसेना शाखा क्रमांक १९१ ही ज्या वास्तूत आहे, त्या केशव भूवन इमारतीमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या प्रवेशद्वारावर सरवणकर यांचीच जाहिरात असल्याने शिवसैनिकांना त्याच प्रवेशद्वारातून जावे लागते. त्याशिवाय या विभागातील प्रत्येक गणेशोत्सव मंडळाला शिंदे गटाच्या सरवणकर यांच्याच जाहिरात तसेच प्रवेशद्वाराच्या कमानी असल्याचे पहायला मिळत आहे.

मात्र अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्याप्रमाणात होणारे गणेश मूर्तींचे विसर्जन पाहता मनसेनेही यातून चमकण्याची संधी सोडली नाही. यंदा प्रथमच टी एच कटारिया मार्गावर मनसेच्यावतीने लाडू वाटपाची सुविधा करण्यात आली आहे, यासह शिवसेना आणि भाजपसह काही समाजसेवी संस्थांनी विविध ठिकाणी लाडू, वडापाव, पॉपकॉर्न, सरबत, ताक आदींचे स्टॉल्स उभारुन भाविकांना याचे वाटप करत खारीचा वाटा उचलण्याचे काम केले. मात्र, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरवणकर यांच्याबरोबरच मनसेनेही विभागात जोरदार बॅनर आणि झेंडे लावून मनसेची ओळख पून्हा करून देण्याचा प्रयत्न केला आहे. इंजिनचे चित्र असलेले मनसेचे झेंडे प्रभादेवीपासून ते माहिमपर्यंत शिवाय माटुंगा रेल्वे स्टेशन ते हिंदुजा तसेच एल जे मार्ग, शिवसेना भवन, रानडे मार्ग आदी परिसरांमध्ये मनसेचे भगवे झेंडे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई, सरचिटणीस संदीप देशपांडे, मनसेचे विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार, उपविभाग अध्यक्ष मनिष चव्हाण तसेच शाखाध्यक्ष संतोष साळी यांच्यासह आदींनी विशेष प्रयत्न संपूर्ण विभागातच झेंडेबाजी करत भगवेमय केल्याचे पहायला मिळत आहे

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.