२०२४ च्या निवडणुकीत ४०० हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य ठरविलेल्या भाजपाने विविध राज्यांमध्ये ‘मिशन लोकसभा’ हाती घेतले असून, संघटनात्मक पातळीवर नियोजनबद्ध कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. या मोहीमेचा एक भाग म्हणून १५ राज्यांमध्ये प्रभारी आणि सह-प्रभारींच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यात महाराष्ट्रातून विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
( हेही वाचा : चंद्रपुरातील बॉटनिकल गार्डनला अटलबिहारी वाजपेयींचे नाव, २५ डिसेंबरला होणार लोकार्पण)
नितिश कुमार यांच्या बंडखोरीमुळे सत्ता गमवाव्या लागलेल्या बिहारची जबाबदारी विनोद तावडे यांच्याकडे देण्यात आली आहे. हरीश द्विवेदी तेथे सह-प्रभारी म्हणून काम पाहतील. शिंदे-फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असलेल्या पंकजा मुंडे यांनाही यात सामावून घेण्यात आले आहे. त्यांच्याकडे मध्यप्रदेशचे सहप्रभारी पद देण्यात आले आहे.त्याशिवाय त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लब देब हरियाणाचे प्रभारी असतील. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी पंजाब-चंदीगड, तर बिहारचे माजी मंत्री मंगल पांण्डेय यांच्याकडे पश्चिम बंगालची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय संबित पात्रा यांना पूर्वेत्तर राज्यांचे समन्वयक बनवण्यात आले आहे.
प्रकाश जावडेकर यांनाही संधी
- माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनाही केंद्रीय पातळीवरील राजकारणात पुन्हा संधी देण्यात आली आहे. त्यांच्याकडे केरळची, तर राष्ट्रीय महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा विजया रहाटकर यांच्याकडे राजस्थानच्या सह-प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान पंकजा मुंडे यांच्याकडे मध्य प्रदेशाचे सहप्रभारीपद देण्यात आले आहे.त्यांना पी मुरलीधर राव यांच्या नेतृत्वाखाली काम करावे लागेल.
- तेलंगणाचे प्रभारीपद दिल्लीतील मातब्बर नेते तरुण चुग यांच्याकडे, तर सहप्रभारीपद अरविंद मेनन यांच्याकडे देण्यात आले आहे.गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना पंजाब जिंकण्याचे लक्ष्य आखून देण्यात आले आहे. त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री विप्लव देव यांनी तेथील नवे मुख्यमंत्री डॉ.माणिक साहा यांच्या मार्गात येऊ नये यादृष्टीने त्यांना थेट हरियाणात आणण्यात आले आहे.
- पक्षप्रवक्ते संबित पात्रा यांच्याकडे आसाम-त्रीपुरा वगळता संपूर्ण ईशान्य भारत देण्यात आला आहे.
- पुढील वर्षी निवडणुका असलेल्या छत्तीसगडच्या प्रभारीपदी ओम माथूर, तर पश्चिम बंगालच्या प्रभारीपदी मंगल पांण्डेय यांची नियुक्ती करण्यात आली आहे.भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय व महिला नेत्या आशा लकडा हे पांण्डेय यांचे सहप्रभारी असतील.