सलग तिसऱ्या दिवशी पावसाने संध्याकाळच्या वेळेत हजेरी लावत हॅट्रीक साधली.परंतु शुक्रवारी अनंत चतुर्दशी असल्याने निरोप घेता बाप्पा आपली आज्ञा असावी असे म्हणत निरोप देण्याची वेळ आली. बाप्पांच्या या विसर्जनाच्यावेळी वरुण राजांनी बरसात करत एकप्रकारे बाप्पांवर अभिषेकच केला. मात्र, बाप्पाला निरोप देताना अशाप्रकारच्या पावसाच्या विघ्नाने घाबरुन न जाता प्रत्येक भाविक हा पावसातच भिजतच मिरणुकीत सहभागी होताना तसेच पाहताना दिसत होता. बाप्पांच्या भक्तीच्या ओलाव्यापुढे पावसाने किती आम्हाला भिजवले तरी भिजतच त्यांना निरोप देऊ, मागे हटणार नाही,असाच काहीसा निर्धार मिरवणुकींमधील भक्तांमधून पाहायला मिळत होता.
( हेही वाचा : ११ माणसांना मारून वाघाची जंगलात उडी; सीटी१ आणि टी२ची जमली जोडी!)
लाडक्या बाप्पाला निरोप
श्री गणरायांना निरोप देण्यासाठी दुपारी चार नंतर रस्ते गर्दी फूलायला लागते. बाप्पांच्या मिरवणुका न्यहाळता याव्यात म्हणून विसर्जन मार्गाच्या आसपासच्या रस्त्यांच्या दोन्ही बाजुला नागरिकांनी मोठ्याप्रमाणात गर्दी केली होती. गणपती बाप्पा मोरया. . . पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत कुणी बॅन्जो तर कुणी नाशिक बाजा तर कुणी स्पीकरवर बाप्पांची गाणी लावत तर कुणी पारंपारिक भजन गात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला.
स्वराज्य भूमी(गिरगाव चौपाटी), दादर शिवाजीपार्क, माहिम, जुहू, गोराई आदी चौपाट्यांसह काही महत्वाचे तलाव आणि कृत्रिम तलावांच्या ठिकाणी बाप्पांच्या मूर्ती विसर्जनासाठी गर्दी दिसून येत होती. परंतु चौपाटीवर इतर पर्यटकांना प्रवेश न देता गणेश मूर्ती विसर्जनासाठी येणाऱ्या घरगुती गणपतीसह मंडळांच्या मोजक्याच कार्यकर्त्यांना चौपाटीवर प्रवेश दिला जात होता. तर गणेश मूर्ती विसर्जन झाल्यानंतर सर्वांना बाहेर काढल्यानंतरही काही पर्यटक फिरत असल्याचे दिसून आल्यास त्यांना त्वरीत पोलिसांच्या माध्यमातून त्यांना बाहेर काढले जात होते. त्यामुळे चौपाटीवर दरवर्षीप्रमाणे पर्यटकांसह इतर भाविकांची गर्दी न झाल्याने चौपाटीवर केवळ विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी दिसून येत होती. त्यामुळे कोविड निर्बंधमुक्तीनंतर यंदा विसर्जनाच्या ठिकाणी मोठ्याप्रमाणात गर्दी होण्याची जी शक्यता वर्तवली जात होती, ती पोलिस आणि महापालिकेच्या नियोजनामुळे कमी दिसून आल्याचे पाहायला मिळत होते.
Join Our WhatsApp Community