तब्बल १०० वर्षांपेक्षा अधिक वर्षांची परंपरा असलेली ही जत्रा ‘मोत माऊली’ ची जत्रा आणि वांद्रे महोत्सव म्हणून देखील ओळखले जाते. यंदा दोन वर्षांनंतर आयोजित होणाऱ्या यात्रेला दररोज एक लाखांपेक्षा अधिक भाविक भेट देतात. या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीवकुमार यांच्या मार्गदर्शनानुसार आणि सह आयुक्त रणजीत ढाकणे यांच्या देखरेखीखाली मुंबई महानगरपालिकेच्या ‘एच पश्चिम’ विभागाद्वारे विविध नागरी सेवा सुविधांबाबत सुयोग्य तयारी करण्यात आली असून भाविकांच्या सेवेसाठी महानगरपालिका सुसज्ज आहे. विशेष म्हणजे यंदा प्रथमच युट्युब, ट्विटर यासारख्या समाज माध्यमांद्वारे या यात्रेचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘एच पश्चिम’ विभागाचे सहाय्यक आयुक्त विनायक विसपुते यांनी दिली आहे.
यात्रा यंदा ११ ते १८ सप्टेंबर २०२२ या दरम्यान संपन्न होणार
वांद्रे (पश्चिम) येथे शतकाहून अधिक परंपरा व वारसा लाभलेली आई माऊंट मेरीची यात्रा यंदा ११ ते १८ सप्टेंबर २०२२ या दरम्यान संपन्न होणार आहे. गेली दोन वर्षे म्हणजेच सन २०२० व २०२१ मध्ये ‘कोविड-१९’ या साथ रोगाच्या प्रादुर्भावामुळे या यात्रेचे आयोजन करण्यात आले नव्हते. मात्र, या साथ रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेल्या विविध उपायोजना आणि प्रभावीपणे राबविलेली लसीकरण मोहीम यामुळे यंदा कोविड संसर्गाचे प्रमाण नियंत्रणात आहे. परिणामी कोविडविषयक बंधने शिथील झाल्यामुळे व धार्मिक स्थळे जनसामान्यांसाठी खुली केल्यामुळे; तसेच सर्व सण, महोत्सव यात्रा निर्बंधमुक्त झाल्यामुळे सालाबाद प्रमाणे या वर्षी या यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून यात्रा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. चर्च व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार यावर्षी प्रतीदिन साधारण १ लाख भाविक दर्शनासाठी व यात्रेसाठी येतील अशी अपेक्षा आहे. येणा-या भाविकांच्या सोयीसाठी आणि स्थानिक परिसरातील गर्दी टाळण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांच्या सहयोगाने वाहतुकीचे मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.
(हेही वाचा मुंबईत यंदा बाप्पा वाढले : तब्बल २८ हजार ९३३ पेक्षा अधिक गणेश मूर्तींची झालेली प्रतिष्ठापना)
महापालिकेने माऊंट मेरी जत्रेच्या ठिकाणी केली अशी व्यवस्था
- परिसराच्या देखरेखीकरीता १०० पेक्षा अधिक ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे
- परिसरातील रस्त्यांची देखभाल – दुरुस्ती योग्य प्रकारे करण्यात आली आहे.
- भाविकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
- परिसराच्या स्वच्छतेसाठी महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याचे कामगार, कर्मचारी व अधिकारी अव्याहतपणे कार्यरत
- ओल्या सुक्या कच-याच्या विल्हेवाटीसाठी स्वतंत्र व्यवस्था
- भाविकांच्या सुविधेसाठी फिरत्या शौचालयांची व्यवस्था
- उच्च न्यायालयाने निर्देशित केल्याप्रमाणे पूजेचे साहित्य, खेळणी इत्यादींच्या विक्रीसाठी माऊंट मेरी रोड, सेंट दि जॉन बॅप्टीस्टा रोड व केन रोड या ठिकाणी तात्पुरत्या पिचेसची लिलाव प्रक्रिया पूर्ण करुन सामान्य जनतेस व स्थानिक नागरीकांना या तात्पुरत्या जागा यात्रेच्या कालावधीत उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
- या परिसरात अनधिकृत स्टॉल्स, अनधिकृत फेरीवाले यांना मज्जाव
- आवश्यकतेनुसार भाविकांना वेळच्या वेळी प्रथमोपचार व वैद्यकीय सेवा सुविधा मिळाव्यात, या दृष्टीने या ठिकाणी प्रथमोपचार कक्ष उभारण्यात आला आहे