कोल्हापुरात १५ ऑक्टोबरला ‘स्वाभिमानी’ची २१ वी ऊस परिषद; एकरकमी FRP चा निर्णय घ्या, अन्यथा… राजू शेट्टींचा इशारा

135

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची २१ वी ऊस परिषद १५ ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर येथे घेण्यात येणार आहे, अशी घोषणा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. शनिवारी कोल्हापूरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत जागर यात्रा

जागर एफआरपीचा संघर्ष ऊस दराचा यासाठी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत २४ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान ९ दिवस जागर यात्रा काढणार आहे. ही यात्रा सरूड, परिते, गडहिंग्लज, निपाणी, येडेमच्छिंद्र, कुंडल, घुणकी, कागल, दत्तवाड, चंदगड, कोडोली, वळीवडे व कांदे या ठिकाणी होईल. यातून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.

मविआ सरकारने शेतकऱ्यांचा केला विश्वासघात

शेट्टी म्हणाले की, तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात करून एफआरपीचे तुकडे करण्याचा कायदा केला मात्र त्यातून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. महाविकास आघाडी सरकारचा निर्णय तातडीने रद्द करावा, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी देखील केली आहे. त्यासंदर्भात शिंदे सरकारने अद्यापही निर्णय घेतलेला नाही.

सरकारकडे ४० दिवसांचा अवधी, रस्त्यावरील लढाईला तयार

एफआरपी दोन तुकड्याचा निर्णय राज्य सरकारने अगोदर रद्द करावा. सरकारला अजून ४० दिवस अवधी आहे. जोपर्यंत एकरकमी एफआरपीचा निर्णय होत नाही. तोपर्यंत राज्यातील एकही साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही. आम्ही कधीही रस्त्यावरील लढाईला तयार आहोत. जागतिक बाजारपेठेत साखरेला चांगली मागणी आहे. बहुतेक देशात यंदा दुष्काळ आहे. भारतात शिल्लक साखर नाही. याचा लाभ आपण उठवावा. उसाचे क्षेत्र जादा असले तरी सर्व उसाचे गाळप करणे ही सरकारची सर्वस्वी जबाबदारी आहे. संघर्ष नको असेल तर तातडीने ऊस दरामध्ये राज्य सरकारने लक्ष घालून यावर निर्णय घ्यावा, अशी मागणी शेट्टी केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.