शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते यांच्यात प्रभादेवी येथे शनिवारी मध्यरात्री तुफान राडेबाजी झाली. यावेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी आपल्या बंदुकीतून गोळ्या झाडल्याचे सांगण्यात येत आहे. त्याबाबत त्यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. सदा सरवणकर यांनी पोलिस ठाण्याच्या बाहेर असलेल्या आवारात जमिनीवर गोळी झाडल्याची जवळजवळ खात्री पोलिसांना पटली आहे.
दादर पोलिसांनी ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणची पाहणी केली असता पोलिसांना एक काडतुसाची रिकामी पुंगळी सापडली असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. ही रिकामी पुंगळी ही सदा सरवणकर वापरत असलेल्या परवाना पिस्तुलची आहे का, हे तपासण्यात येणार असून सरवणकर यांचे पिस्तुल आणि रिकामी पुंगळी तपासणीसाठी फॉरेन्सिक विभागाकडे पाठवण्यात येणार असल्याचे समजत आहे.
(हेही वाचाः मी गोळ्या झाडल्या नाहीत, पोलिसांना पूर्ण सहकार्य करणार- सदा सरवणकर)
10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल
त्याच बरोबर पोलिस ठाण्याच्या आवारात असलेले सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागल्यामुळे गोळीबार झाल्याची जवळजवळ खात्री पटली आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. या सबळ पुराव्यावरून दादर पोलिसांनी शिंदे गटातील आमदार सदा सरवणकरसह इतर १० ते १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यात आर्म्स कायदा (शस्त्र अधिनियम कायदा) कलम लावण्यात आले आहे.
जामिनावर सुटका
दादर पोलिसांनी शनिवारी रात्री ठाकरे गटावर गुन्हा दाखल करून विभाग प्रमुख महेश सावंत यांच्यासह ५ जणांना अटक करून त्यांच्या विरुद्ध दंगलीसह जबरी चोरीचे कलम लावण्यात आले होते. मात्र तपासात जबरी चोरी झाली नसल्याचे समोर आले असून ३९५ हे कलम काढण्यात आले आहे. त्यांची वैयक्तिक जामिनावर पोलिस ठाण्यातून सुटका करण्यात येणार असल्याचे समजते.
(हेही वाचाः प्रभादेवीतील राड्याप्रकरणी सदा सरवणकर यांच्यावर गुन्हा दाखल)
Join Our WhatsApp Community