म्हाडाचे घर लागावे अशी प्रत्येक अर्जदाराची इच्छा असते. पण त्यातील मोजकेच नशीबवान ठरतात. विजेत्यांच्या यादीत नाव आल्यानंतरची प्रक्रियाही सोपी नसते. कागदपत्र पडताळणीवेळी वारंवार तांत्रिक मुद्दे उपस्थित करून फाईल अडवली जात असल्याने गृहनिर्माण भवनात दररोज खेटे घालणाऱ्यांची गर्दीही दिवसागणिक वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन म्हाडाने सोडत प्रक्रियेतील मानवी हस्तक्षेप थांबवण्यासाठी विशेष प्रणाली आणली आहे. त्यामुळे म्हाडाभोवतीचा दलालांचा विळखा सुटण्यास मदत होणार आहे.
ऑनलाइन सोडतीतही भ्रष्टाचार
म्हाडाकडून मुंबईसह राज्यभरात गृहनिर्माण प्रकल्प राबविले जातात. त्यात उपलब्ध घरांच्या तुलनेत इच्छुकांची संख्या अधिक असते. त्यामुळे घरांची विक्री करण्यासाठी सोडत पद्धती स्वीकारण्यात आली आहे. आधी चिठ्ठ्यांच्या माध्यमातून सोडत काढली जायची. गेल्या काही वर्षांपासून ऑनलाइन पद्धतीचा अवलंब केला जात आहे. परंतु, सोडत प्रक्रिया ऑनलाइन केल्यानंतरही भ्रष्टाचार सुरूच असून, सोडतीनंतरची प्रक्रिया अनेक वर्षे संपत नसल्याचे चित्र आहे. प्रतीक्षा यादी वर्षानुवर्षे पूर्ण होताना दिसत नाही. एखाद्याला ताबा मिळण्यासाठी १५ ते २० वर्षेही लागतात.
या सर्व बाबी लक्षात घेऊन म्हाडाने सोडतीची संपूर्ण प्रक्रियाच बदलण्याचा निर्णय घेतला आहे. प्राधिकरणाने हा प्रस्ताव मान्य केला असून आता राज्य सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. यासाठी नवीन संगणकीय प्रणाली तयार करण्यात येत आहे. लवकरच तिची चाचणी पूर्ण होऊन ती कार्यान्वित केली जाईल.
म्हाडाची प्रतीक्षा यादी बंद होणार
- म्हाडाच्या सोडतीत एका घरामागे एक वा काही सोडतीत एकापेक्षा दोन वा तीन अर्जदारांची निवड प्रतीक्षा यादीच्या माध्यमातून करण्यात येते.
- मूळ विजेता अपात्र ठरल्यानंतर त्या जागी प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांना संधी दिली जाते.
- यादीवरील पहिला विजेता अपात्र ठरल्यास यादीवरील पुढील विजेत्याला संधी दिली जाते. ही यादी अशीच पुढे जाते.
- परंतु, प्रतीक्षा यादी १५ ते २० वर्षे संपत नसून विजेत्यांना वेठीस धरत अधिकारी आणि दलाल घर वितरणात भ्रष्टाचार करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.
- त्यामुळे प्रतीक्षा यादी बंद करण्याचा प्रस्ताव प्राधिकरणासमोर ठेवण्यात आला आहे.
- प्रतीक्षा यादी बंद केली तर अपात्रतेमुळे विकल्या न गेलेल्या घरांसाठी पुन्हा एकत्रित सोडत काढली जाईल, असे मुंबई मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
- म्हाडाने सोडतपूर्व आणि सोडतीनंतरची संपूर्ण प्रक्रिया आधीच ऑनलाइन केली आहे. मात्र, यापुढे प्रतीक्षा यादी नसेल.
- आतापर्यंत सोडतीसाठी काही ठराविक (पॅनकार्ड, आधारकार्ड) कागदपत्रे लागत होती आणि सोडतीनंतर विजेत्यांकडून उत्पन्नाचा दाखला, निवासाचा दाखला, आरक्षणानुसार जात प्रमाणपत्र इतर कागदपत्रे जमा करून घेत पात्रता निश्चित केली जात होती.
- आता मात्र अर्ज भरतानाच सर्व कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत. सोडतीपूर्वी पात्रता निश्चिती पूर्ण होणार आहे. त्यामुळे निकालानंतर थेट देकार पत्र देऊन विजेत्यांकडून घराची रक्कम भरून घेतली जाईल. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असेल.
- त्यामुळे भ्रष्टाचाराला खीळ बसणार असून दलालांना वाव राहणार नसल्याचा दावा केला जात आहे.