शनिवारी मध्यरात्री शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते यांच्यात दादरमधील प्रभादेवी परिसरात तुफान राडेबाजी झाली. त्यानंतर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्याविरोधात बंदुक चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यातील राजकारण हे अशा पद्धतीने तापलेले असताना आता केंद्रीय मंत्री नारायण यांनी सोमवारी आमदार सदा सरवणकर यांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना चांगलाच रंग चढला आहे.
या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे गटावर टीका करतानाच सूचक असा इशारा देखील दिला आहे. असे हल्ले करू नका, महाराष्ट्रात फिरायचं आहे, परवानग्या घ्याव्या लागतील, असा थेट इशारा यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला आहे.
राणेंचा इशारा
आमदार सदा सरवणकर हे माझे जुने मित्र आहेत. त्यामुळे जी काही घटना घडली त्याबाबत त्यांची विचारपूस करण्यासाठी मी आलो आहे. सरवणकर यांच्याविरोधात आर्म्स अॅक्ट अंतर्गत जो गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याबाबत पोलिस चौकशी करतील. जर फायरिंग झाली असेल तर फायरिंगचा आवाज तर येतो ना?, त्यामुळे आता शिवसेनेकडे तक्रार करण्याशिवाय दुसरं काही उरलं नाही. मातोश्रीच्या दुकानात बसून तक्रारींचं मार्केटिंग करण्याचं काम चालू आहे. पण असे हल्ले करू नका, शेवटी मुंबई आणि महाराष्ट्रात राहायचं आहे,फिरायचं आहे, परवानग्या घ्याव्या लागतील, असा इशाराही नारायण राणे यांनी यावेळी दिला आहे.
(हेही वाचाः अजित पवार राष्ट्रवादीवर नाराज? पक्षाच्या अधिवेशनातून निघून जाण्याबाबत केला मोठा खुलासा)
अशा धांगडधिंग्याची आम्ही दखल घेत नाही. पण जेव्हा आम्ही याची दखल घेऊ तेव्हा यांना कळेल की चालणं,बोलणं,फिरणं किती कठीण होईल ते, असेही नारायण राणे यांनी यावेळी म्हटले आहे. 50 जण मिळून एका व्यक्तीला मारण्यासाठी थेट त्याच्या घरी जातात हा गुन्हा नाही का? अशा गुन्ह्याला आयपीसीच्या 354 अंतर्गत गुन्हा नोंदवला गेला पाहिजे जो अजामीनपात्र आहे, असेही नारायण राणे यांनी यावेळी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community