वरिष्ठ पोलीस अधिकारी बदलीच्या प्रतीक्षेत

154

मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी बदलीकडे डोळे लावून बसलेले आहेत, त्यांच्या बदलीच्या आदेशाची यादी राज्य गृह विभागाकडून येत्या काही आठवड्यात जाहीर केली जाणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. ज्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा मुंबईतील कार्यकाळ संपला आहे, अशा अधिकाऱ्यांची बदली मुंबईबाहेर करण्यात येणार आहे. वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांपाठोपाठ सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या लवकरच होतील.

( हेही वाचा : ICC T20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा; ‘या’ तारखेला पाकिस्तानविरूद्ध पहिला सामना)

लवकरच बदलीचे आदेश

मुंबई पोलीस आयुक्तालयातील अनेक वरिष्ठ अधिकारी बढतीसाठी पात्र आहेत. मात्र सरकारकडून निर्णय होत नसल्याने हे अधिकारी अनेक दिवसांपासून बढतीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र या अधिकाऱ्यांची प्रतीक्षा संपलेली असून गृहविभागाकडून लवकरच ही बदल्याची यादी जाहीर केली जाणार असल्याचे समजते. मुंबईत सहपोलीस आयुक्त, अप्पर पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त दर्जाच्या अनेक अधिकाऱ्यांचा मुंबईतील कार्यकाळ केव्हाच संपला आहे. नवीन सरकार स्थिरस्थावर नसल्यामुळे या बदल्या रखडल्या, त्यात गणेशोत्सव हा सण असल्यामुळे बदलीचे आदेश पुढे ढकलण्यात आले होते.

मुंबईत कार्यकाळ संपणाऱ्या अधिकाऱ्यांची यादी तसेच इतर याद्या सरकारकडे केव्हाच पाठविण्यात आलेल्या असून त्याच्यावर येत्या काही दिवसात शिक्कामोर्तब होऊन गृहमंत्रालयाकडून लवकरच बदलीचे आदेश काढण्यात येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.