राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट दिसून येत असली तरीही १४२ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. १० सप्टेंबरपर्यंत रुग्णालयात कोरोना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झालेल्या ५४७ रुग्णांपैकी १४२ रुग्ण गंभीर आहेत. त्यापैकी ९८ रुग्णांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. ९८ रुग्णांपैकी १९ रुग्णांना कृत्रिम श्वासोच्छवासाचा आधार घ्यावा लागला आहे. ७९ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. ११ सप्टेंबरपर्यंत राज्यभराच्या तुलनेत मुंबई आणि ठाण्यात सक्रीय रुग्णांची संख्या जास्त असली तरीही पुणे आणि चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा पॉझिटीव्हीटी दर जास्त दिसून आला आहे.
( हेही वाचा : रेल्वेने विदर्भ दौऱ्यावर जाणारे राज ठाकरे म्हणतात, ‘काही डबे जोडण्याचे काम सुरु आहे’)
मुंबईत १ हजार ७११ तर ठाण्यात १ हजार ४३७ सक्रीय कोरोना रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. मात्र साप्ताहिक पॉझिटीव्हीटी रेटच्या प्रमाणात पुणे आणि चंद्रपूरात रुग्ण वाढत असल्याचे निरीक्षण आरोग्य विभागाकडून नोंदवले गेले. पुण्यात ऑगस्ट महिन्यात २१ तारखेपर्यंत साप्ताहिक रुग्णांचा पॉझिटीव्हीटी रेट १०.५२ वरुन १०.०२ टक्क्यांवर घटला. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पॉझिटीव्ह रुग्ण सापडण्याच्या क्रमांकात पुणे अद्याप पहिल्या स्थानावर आहे. चंद्रपूरात वाढता पॉझिटीव्ह दर पाहता रुग्णवाढीबाबत चिंता व्यक्त होत आहे. चंद्रपूरात ९.४८ पॉझिटीव्हीटी दर नोंदवला गेला आहे. त्याखालोखाल सिंधुदुर्ग, रायगड आणि कोल्हापूरात रुग्ण वाढ दिसून येत असल्याचे राज्यात जिल्हानिहाय झालेल्या ५ ते ११ सप्टेंबर दरम्यानच्या दर दिवसाच्या नव्या रुग्ण नोंदीत आढळले आहे. यासह हिंगोली, रत्नागिरी, ठाणे, सांगली, पालघर, साता-यातही पॉझिव्हीटी दर जास्त असल्याचे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले.
जिल्हानिहाय साप्ताहिक रुग्ण पॉझिटीव्हीटी दर –
- पुणे – १०.०२ टक्के
- चंद्रपूर – ९.४८ टक्के
- सिंधुदुर्ग – ७.३४ टक्के
- रायगड – ६.२१ टक्के
- कोल्हापूर – ६.०९ टक्के
- हिंगोली – ५.४३ टक्के
- रत्नागिरी – ५.३७ टक्के
- ठाणे – ५.२२ टक्के
- सांगली – ४.८५ टक्के
- पालघर – ४.४१ टक्के
- सातारा – ४.३५ टक्के