प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात सोमवारी “यशोयुताम् वंदे”च्या नादात प्रेक्षक तल्लीन झाल्याचे पहायला मिळाले. पुणे येथील कलासक्त संस्थेच्या २५ नृत्यांगनांनी हा अनोखा कलाविष्कार सादर केला.
( हेही वाचा : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात ‘सेवा पंधरवडा’ – देवेंद्र फडणवीस )
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ‘स्वातंत्र्य आंदोलन इतिहास आधार साहित्य खंड – १ ते १३’ या मोबाइल ॲपचे रवींद्र नाट्य मंदिर येथे लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्यादरम्यान स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या रचनेवर आधारित “यशोयुताम् वंदे” हा कार्यक्रम सादर करण्यात आला. पुणे येथील कलासक्त संस्थेच्या २५ नृत्यांगनांनी यात सहभाग घेतला. वीर सावरकर यांच्या अज्ञात पैलूवर प्रकाश टाकणाऱ्या मराठी, हिंदी, उर्दू भाषेतील निवडक रचनांवर त्यांनी शास्त्रीय नृत्य सादर केले. दीपा सपकाळ यांच्या सूत्रसंचालनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.
सारंग कुलकर्णी यांच्या संकल्पनेवर आधारित कलाविष्काराचे सांस्कृतिक मंत्र्यांनीही कौतुक केले. कलासक्त संस्थेच्या रसिका गुमास्ते आणि सारंग कुलकर्णी यांना मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात प्रतिमा भेट देण्यात आली. यावेळी मनोगत व्यक्त करताना गुमास्ते यांनी कलाकारांना राजाश्रयाची गरज व्यक्त केली. त्यावर, कलासक्त संस्थेला निश्चित मदत केली जाईल, असे आश्वासन सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
‘जयोस्तुते’ने कार्यक्रमाची सुरुवात
‘जयोस्तुते’ गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, ने मजसी ने परत मातृभूमीला, तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू-बंधू, अनादी मी अनंत मी, यही पाओगे (गझल) अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या निवडक रचनांवर शास्त्रीय नृत्य सादर करण्यात आले.
Join Our WhatsApp Community