दादरच्या घटनेनंतर शिवसेना शिंदे गटाविरोधात आता अधिक आक्रमक

150

आमदार व खासदार यांच्यासह माजी नगरसेवक आणि पदाधिकारी हे शिवसेना सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटांमध्ये सामील होत असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची शिवसेना हवालदिल झाली आहे. पक्षातून एकेक निघून जात असताना शिवसेनेत इतर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना प्रवेश दिला जात आहे. परंतु तेव्हा राज्यात सरकारमध्ये असल्याने आक्रमक होता येत नसले तरी आता सरकारमध्ये नसल्याने बिनधास्त नडा अशाप्रकारच्या सूचनाच आता मातोश्रीवरुन शिवसैनिकांमध्ये केल्या जात आहे. त्यातूनच दादरमधील शिंदे गटाच्या शाखाप्रमुखाला मारहाण करून त्यांना शिंदे गटाला शिवसेनेचा इंगा दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या मारहाणीबाबत अटकेनंतर जामीनावर सुटका झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवसैनिकांना मातोश्रीवर बोलावून घेत त्यांच्या पाठिवर कौतुकाची थाप मारली.

( हेही वाचा : शिवसेनेच्या राडेबाजीमुळे दसरा मेळाव्याच्या अडचणी वाढल्या!)

मुंबईत कायदा आणि सुव्यवथेचा प्रश्न निर्माण होण्याचीही भीती

आगामी निवडणुकीत शिंदे गटच भारी पडणार असल्याने त्यांना आताच इंगा दाखवायला हवा अशाप्रकारची भूमिका आता दादरच्या घटनेनंतर शिवसेनेने घेतली असून ज्या ज्या भागांमध्ये शिंदे गट सक्रीय आहे, त्या भागांमध्ये शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची ताकद वाढू देऊ नका, त्यांना तिथेच रोखा अशाप्रकारच्या सूचनाही मातोश्रीवरून गेल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे दादरची शिवसेनेची ऍक्शन मोड इतरही विभागांमध्ये दिसून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिंदे यांच्यासोबत मुंबईतील खासदार राहुल शेवाळे तसेच आमदार सदा सरवणकर, प्रकाश सुर्वे, दिलीप लांडे, मंगेश कुडाळकर, यामिनी जाधव तसेच माजी नगरसेविका शितल म्हात्रे यांच्यासह काही शाखाप्रमुख व इतर पदाधिकारीही गेले आहेत. त्यामुळे यासर्व भागांमधील शिवसैनिकांना ऍक्टीव्ह मोडवर आणण्याचे काम शिवसेना करत असून ज्याप्रकारे दादरमध्ये सरवणकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांना शिवसैनिकांनी अस्मान दाखवले, तसेच अस्मान इतर शिंदे समर्थकांना येत्या काही दिवसांमध्ये दाखवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे तसे घडल्यास मुंबईत कायदा आणि सुव्यवथेचा प्रश्न निर्माण होण्याचीही भीती आता नागरिकांना वाटू लागली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.