सिकंदराबादमध्ये भीषण अग्नितांडव! इलेक्ट्रिक बाईक चार्ज करताना आगीचा भडका, ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी

161

तेलंगणातील सिकंदराबाद येथील रुबी रतन हॉटेलला काल, सोमवारी रात्री उशिरा लागलेल्या आगीत ८ जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर १३ जण जखमी झाले. मृतांचा आकडा वाढण्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे. या भीषण आगीचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

(हेही वाचा – J & K SI Recruitment Scam: दिल्ली-यूपीसह देशभरात 33 ठिकाणांवर CBI ची छापेमारी)

मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेलच्या तळ मजल्यावर असलेल्या रुबी इलेक्ट्रिक व्हेईकलच्या शोरूममध्ये दुचाकीच्या बॅटरीचा स्फोट झाल्याने आग लागल्याचा अंदाज पोलिस आयुक्त सीव्ही आनंद यांनी व्यक्त केला आहे. या शोरुममध्ये इलेक्ट्रिक बाईक चार्ज होत होती. यामुळे शॉर्ट सर्किट झाले आणि आग लागली. त्यानंतर ही आग संपूर्ण हॉटेलच्या इमारतीत पसरली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आगी लागली तेव्हा तेथे साधारण 25 जण होते. आगीमुळे आणि धुरामुळे 8 जणांचा गुदमरून मृत्यू झाला. मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. तर 13 जण जखमी झाले आहेत.

दरम्यान, हॉटेलच्या खिडकीतून खाली उडी मारून जीव वाचवण्याच्या प्रयत्नात काही जण जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेत अनेकांना सुखरूप बाहेर काढले. या हॉटेलमध्ये 25 खोल्या असून 12 हून अधिक खोल्यांमध्ये अनेक लोकं थांबले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आग आटोक्यात आणून 15 जणांची सुटका केली. तीन मृतांची ओळख पटली आहे. त्यामध्ये चेन्नईचे सीतारामन, बिहारचे वीरेंद्र कुमार आणि विजयवाडा येथील हरीश कुमार यांचा समावेश आहे. जखमींना सरकारी गांधी हॉस्पिटल, यशोदा हॉस्पिटल आणि हैदराबादमधील इतर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

या अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला असून ट्वीटरद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ” तेलंगणातील सिकंदराबाद येथे लागलेल्या आगीमध्ये झालेल्या जीवितहानीमुळे दु:ख झाले. शोकाकुल कुटुंबियांप्रति शोक संवेदना. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो. मृतांच्या वारसांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची सानुग्रह मदत दिली जाईल.”

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.