मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारमधील सर्व १८ मंत्र्यांना मंत्रालयातील दालनांचे वाटप करण्यात आले. मात्र,अद्यापही १३ मंत्र्यांनी आपल्या दालनात प्रवेश केलेला नाही. पितृपक्ष सुरू असल्याने तूर्त त्यांनी नव्या वास्तूमध्ये जाण्याचे टाळले असून, पितृपंधरवडा सरल्यानंतरच ते मंत्रालयातून कारभार सुरू करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
९ ऑगस्टला शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. शिवसेना आणि भाजपकडून एकूण १८ मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यानंतर २४ ऑगस्ट रोजी नवनिर्वाचित मंत्र्यांना दालनाचे वाटप करण्यात आले. मात्र १९ दिवस उलटले तरी अद्याप १३ मंत्र्यांनी मंत्रालयातील दालनात पाऊल ठेवलेले नाही. गणेशोत्सव काळातील लांबलचक दौऱ्यांमुळे उशीर झाल्याचे सांगण्यात येत असले, तरी गणेशोत्सवानंतरही संबंधित मंत्र्यांनी दालनाकडे पाठ फिरवल्याचे पहायला मिळत आहे. २५ सप्टेंबरला पितृपक्ष सरल्यानंतरच ही मंडळी मंत्रालयातून कारभार सुरू करतील, असे कळते.
( हेही वाचा: लोकमान्य टिळक टर्मिनसवर लवकरच रेस्टॉरंट ऑन व्हील्स )
आतापर्यंत केवळ ५ मंत्र्यांनी मंत्रालयातील दालनात प्रवेश केला आहे. त्यात गुलाबराव पाटील, शंभुराज देसाई, संजय राठोड, दीपक केसरकर, गिरीश महाजन यांचा समावेश आहे. काही मंत्र्यांच्या खासगी सहाय्यकांशी याबाबत संवाद साधला असता, दालनात नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने अद्याप प्रवेश केला नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.