भाजपाच्या ‘मिशन बारामती’मध्ये मित्रपक्षाकडून आडकाठी; मंत्रिपदासाठी दबावतंत्र?

172
एकीकडे भाजपाने ‘मिशन बारामती’ची घोषणा केली असताना, मित्रपक्षातील महादेव जानकर यांनीही या लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितल्याने पेच निर्माण झाला आहे. २०१४च्या निवडणुकीत जानकरांनी बारामतीमधून तब्बल ४२ टक्के मते मिळवली होती. त्यामुळे जानकरांच्या रूपाने भाजपासमोर नवे आव्हान उभे ठाकले आहे.
भाजपाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पवारांच्या बालेकिल्ल्यात जात बारामती काबीज करण्याचे आव्हान दिले. येत्या अडीच वर्षांत बारामती लोकसभा मतदारसंघाचा कानाकोपरा पिंजून काढून विजय खेचून आणायचा, अशी भाजपाची रणनीती आहे. त्यासाठी राज्यातील नेत्यांना केंद्रीय नेतृत्त्वाची साथ मिळणार आहे. असे असताना आता राष्ट्रीय समाज पक्षाच्या (रासप) महादेव जानकर यांनी या मतदारसंघावर दावा सांगितल्याने अडचण निर्माण झाली आहे.

…तर जानकर विजयी झाले असते

  • बारामती लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाची मतदारसंख्या मोठी आहे. त्यात जानकर यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे.
  • लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत जानकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण केले होते.
  • या निवडणुकीत सुळे यांना ५ लाख २१ हजार ५६२, तर महादेव जानकर यांना ४ लाख ५१ हजार ८४३ मते मिळाली होती.
  • म्हणजे सुप्रिया सुळे यांना जानकरांपेक्षा केवळ ६९ हजार अधिक मते मिळाली होती. जानकर भाजपाच्या तिकिटावर लढले असते, तर विजय निश्चित होता, असा निष्कर्ष त्यावेळेस काढण्यात आला होता.
  • २०२४ च्या निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात सर्वशक्तीनिशी उतरण्याचे नियोजन भाजपाने केले असताना जानकर स्वबळावर लढल्यास ते सुप्रिया सुळे यांच्या पथ्यावर पडणार आहे.
  • त्यामुळे भाजप जानकर यांची समजूत काढण्यासाठी अशाप्रकारे प्रयत्न करते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

(हेही वाचा वक्फ बोर्डाचा मनमानी कारभार! हिंदू बहुसंख्य असलेल्या संपूर्ण गावावरच सांगितली मालकी

मंत्रिपदासाठी दबावतंत्र?

आपला पक्ष सोडून भाजपाच्या तिकिटावर लढण्यास जानकर तयार नाहीत. त्यामुळे भाजपाने कांचन कुल यांना तयारीला लागण्याचे निर्देश दिले आहेत. अशा स्थितीत बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी, भाजपा आणि रासप अशी तिरंगी लढत झाल्यास आपला पराभव निश्चित आहे, याची कल्पना जानकर यांना आहे. त्यामुळे भाजपासमोर आव्हान निर्माण करून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एखादे मंत्रिपद पदरात पाडून घ्यायचे, अशी जानकर यांची योजना असल्याचे बोलले जात आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.