शिवाजीपार्क दसरा मेळावा प्रकरणी महापालिका विधी विभागाचा अभिप्राय घेणार?

132

परंपरागत दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेच्या अर्जापाठोपाठ शिंदे गटानेही शिवाजीपार्कवर मेळावा आयोजित करण्यासाठी अर्ज केल्याने महापालिकेच्या अडचणीत भर पडली आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून आलेल्या अर्जावर प्रत्यक्षात काय निर्णय घ्यावा या द्विधा मनस्थितीत महापालिका प्रशासन अडकले असून याकरता आता महापालिका प्रशासन विधी विभागाचा अभिप्राय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे प्रशासनाल स्वत:ला ‘सेफ’ ठेवण्यासाठी तसेच भविष्यात कुणी न्यायालयात गेल्यास कोणत्याही अडचणी वाढू नये म्हणून प्रशासन आधीच विधी विभागाचा अभिप्राय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे.

( हेही वाचा : मुंबईत आणखी २४ बायोटॉयलेटची उभारणी)

शिवसेनेचा परंपरागत दसरा मेळावा शिवाजीपार्कवर आयोजित केला जात असून या शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र गट बाजुला होत त्यांनी राज्यात भाजपसोबत युतीचे सरकार स्थापन केले. त्यामुळे खरी शिवसेना आपलीच असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाने शिवाजीपार्कवरील दसरा मेळाव्याला परवानगी मिळण्याबाबत केलेल्या अर्जापाठोपाठ शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनीही साठी अर्ज केला. त्यामुळे दोन्ही गटांचे अर्ज प्राप्त झाल्याने नक्की कुणाला परवानगी द्यायची या कात्रीत महापालिका प्रशासन अडकले आहे.

आजवर ज्याचा पहिला अर्ज त्याला परवानगी हा निकष लावायचा झाल्यास ठाकरे गटाला परवानगी द्यावी लागेल. यावरून शिंदे गट नाराज होऊ वादही निर्माण होऊ शकतात. ही परिस्थिती लक्षात घेता कायदेशीर मत मागवून त्याद्वारेच परवानगी देण्याच्या हालचाली आता महापालिका प्रशासनाने सुरु केल्याची माहिती मिळत आहे.

विधी विभागाकडून जे दोन अर्ज प्राप्त झाले त्या संदर्भात काय निर्णय घेणे योग्य ठरेल तसेच या दोन्ही गटांच्या खऱ्या शिवसेनेबाबतही न्यायालयात वाद सुरु आहे यासंदर्भातही न्यायालयात काय स्थिती आहे. याबाबतही कायदेशीर अभिप्राय मागवून घेण्याचा विचार केला जात आहे. याप्रकरणी कोणाही एकाला परवानगी दिल्यास त्यातून प्रशासनाचे अधिकारी भरडले जाणार असून भविष्यात या निर्णयामुळे महापालिकेची भूमिका भविष्यात कुणी न्यायालयात आव्हान देण्याचा प्रयत्न केल्यास तिथेही ठामपणे मांडता यावी यासाठी हे कायदेशी अभिप्राय विधी विभागाकडून मागवून घेतले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिवसेना गटप्रमुखांचा येत्या २१ सप्टेंबरला मेळावा

दरम्यान, ठाकरे गटाच्या शिवसेनेने दसरा मेळाव्या जय्यत तयारी केली असून हा मेळावा म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. एकप्रकारे त्यांना शक्ती प्रदर्शन करण्यासाठी हा अति महत्वाचा आहे. त्यामुळे हा मेळावा यशस्वी करण्यासाठी अगदी शेवटातील पदाधिकारी असलेल्या गट प्रमुखांचा मेळावा येत्या २१ सप्टेंबर रोजी गोरेगाव येथील एनएससी संकुलात आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहे. गटप्रमुखांच्या माध्यमातूनही शिवसेना दसरा मेळाव्यापूर्वी शक्तीप्रदर्शन करणार असून दसरा मेळावा यशस्वी करण्याची जबाबदारीही गटप्रमुखांवर सोपवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.