भारताने गेल्या आठवड्यात तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. त्यामुळे आशियातील बाजारपेठेत तांदळाच्या दरात 4 ते 5 टक्क्यांची वाढ झाली. भारत नव्या व्यापारी करारावर स्वाक्षरी करत नसल्याने तांदळाचा व्यापार ठप्प झाल्याचे चित्र आहे.
( हेही वाचा : नवरात्रीसाठी मुंबईकरांना ‘बेस्ट’ गिफ्ट! BKC ते ठाणे सुरू होणार प्रिमियम बससेवा)
आशिया खंडातील तांदळाच्या किमती 5 टक्क्यांपर्यंत वाढल्या
भारत जगातील 150 हून अधिक देशांना तांदूळ निर्यात करतो. यावर्षी सरासरीहून कमी पाऊस झाल्याने स्थानिक बाजारपेठेतील दरवाढीला आळा घालण्यासाठी भारताने तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली. त्यामुळे ग्राहक व्हिएतनाम, थायलंड आणि म्यानमारमध्ये पर्याय शोधत आहेत. मात्र, या देशांतील व्यापाऱ्यांनी तांदळाचे भाव वाढवले आहेत. आशिया खंडातील तांदळाच्या किमती 5 टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. आशियातील तांदळाचा व्यापार ठप्प झाला आहे. जगातील एकूण तांदूळ निर्यातीत भारताचा वाटा 40 टक्के आहे त्यामुळे येत्या काही दिवसात तांदळाचे भाव आणखी वाढणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
4 दिवसांत तांदळाचे दर सुमारे 1500 रुपयांनी वाढले
तांदूळ हे जगातील तीन अब्ज लोकांचे मुख्य अन्न आहे. भारताने 2007 मध्येही तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. त्यानंतर तांदळाची किंमत 1 हजार डॉलर प्रति टन इतकी विक्रमी पातळीवर गेली होती. भारत सरकारच्या निर्णयानंतर देशातील प्रमुख बंदरांवर जहाजांमध्ये तांदूळ भरण्याचे काम थांबले आहे. सुमारे 10 लाख टन तांदूळ तेथे पडून आहे. सरकारने लादलेला नवीन 20 टक्के कर भरण्यास खरेदीदार नकार देत आहेत. भारताचे प्रतिस्पर्धी देश थायलंड, व्हिएतनाम आणि म्यानमारमधील व्यापारी भारतातून तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातल्याचा फायदा घेत आहेत. तांदळाचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी खरेदीदार या देशांकडे वळत आहेत. मात्र, या देशांतील व्यापाऱ्यांनी तांदळाच्या दरात 5 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे गेल्या 4 दिवसांत तांदळाचे दर सुमारे 1500 रुपयांनी वाढले आहेत.
Join Our WhatsApp Community