वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प हा महाराष्ट्रात होणार त्यादृष्टीने सर्व पातळीवर निर्णय प्रक्रिया सुरु असताना अचानक हा प्रकल्प गुजरातकडे गेला आहे, त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारवर चौहूबाजूने टीका होऊ लागली आहे. आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. त्यातच राज्य सरकारने या प्रकल्पासाठी तळेगाव येथे चक्क भूसंपादनही सुरु केले होते, अशी माहिती समोर आली आहे प्रकल्पासाठी भूसंपादन सुरु झाले असताना अशा टप्प्यावर हा प्रकल्पच गुजरातला गेला असल्याने या विषयांचे गांभीर्य अधिक वाढले आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्या मावळातील शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे. पुण्याजवळच्या तळेगाव दाभाडे एमआयडीसीमध्ये हा प्रकल्प उभा राहणार होता. हा प्रकल्प परत आणण्याच्या मागणीसाठी आंदोलन उभारण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.
१ हजार एकर जमीन दिली जाणार होती
मुंबई – पुणे महामार्गावरील तळेगाव एमआयडीसीच्या टप्पा क्रमांक चार मधील जमीन फॉक्सकॉन – वेदांताला देऊ करण्यात आली होती. मावळमधील आंबळे, निगडे, कल्हाट आणि पवळेवाडी शिवारातील सुमारे 6000 एकर जमीन टप्पा चार साठी संपादित करण्यात येत आहे. ही संपादन प्रक्रिया मागील चार वर्षांपासून सुरू असून शेतकऱ्यांच्या सातबारावर एमआयडीसीचा शिक्का देखील पडलेला आहे. इतकेच नाही तर शेतकऱ्यांना काही प्रमाणात मोबदला देखील देण्यात आला आहे. संपादित करण्यात येत असलेल्या एकूण जमिनीपैकी सुमारे 1000 एकर जमीन फॉक्सकॉन – वेदांताला देण्याचे राज्य सरकारने कबूल केले होते. त्याशिवाय गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन म्हणून अनेक प्रकारच्या सवलती तसेच सुविधा राज्य सरकारने देऊ केल्या होत्या. एका अर्थाने या कंपनीसाठी राज्य सरकारने रेड कार्पेट अंथरले होते. त्याचा परिणाम म्हणून कंपनीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. सुरुवातीला इथल्या शेतकऱ्यांनी प्रकल्पासाठी जमिनी देण्यास विरोध केला होता. मात्र त्याचे महत्त्व पटल्यानंतर त्यांनी स्वतःहून जमिनी देऊन केल्या.
(हेही वाचा ही ‘फसवी’ आदित्य सेना…, फॉक्सकॉन-वेदांता प्रकल्पावरुन पुरावे देत राणेंचा ठाकरे गटावर निशाणा)
Join Our WhatsApp Community