मुंबईतील रस्त्यांवर एक युनिक नंबर प्लेट असलेली वाहने दिसू लागली आहेत, या युनिक नंबर प्लेटची वाहने बघून अनेकांना प्रश्न पडत असेल की, ही वाहने नक्की कुठल्या देशातील आहे, परंतु ही वाहने आपल्याच भारत देशातील वेगवेगळ्या राज्यांतील आहेत. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थायिक होणाऱ्या नागरिकांसाठी तसेच केंद्र सरकारच्या अखत्यारीत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या वाहनांसाठी केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने २०२१ मध्ये युनिक नंबर प्लेटची नोंदणी सुरू केली आहे.
( हेही वाचा : पुणे महानगरपालिकेने नागरिकांकडून वाढीव मिळकत कर वसूल करू नये – चंद्रकांत पाटील)
भारतात अनेकांना व्यवसायाकरता किंवा नोकरीत होणाऱ्या बदलीमुळे विविध राज्यांत स्थायिक व्हावे लागते. त्यात केंद्र शासनाच्या अखत्यारीत नोकरी करणारे सरकारी कर्मचारी, अधिकारी यांची प्रत्येक ५ वर्षांनी बदली होत असल्यामुळे त्यांना भारतभर कुटुंबासह जावे लागते, उरला प्रश्न वाहनांचा, तर व्यावसायिक आणि अधिकाऱ्यांकडे असणारी वाहने दुसऱ्या राज्यात घेऊन गेल्यावर प्रत्येक राज्यात वाहनांची नोंदणी करावी लागत असल्यामुळे त्यात अधिक वेळ व पैसा जात होता. याच्यावर उपाय म्हणून केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने युनिक नंबर प्लेट आणि एकदाच नोंदणी करण्याचा नियम देशात ऑगस्ट २०२१ मध्ये लागू केला आहे. तुम्ही कुठल्याही राज्यात स्थायिक होत असाल, तर त्या राज्यात तुमच्या जुन्या वाहनांची नोंदणी केल्यावर तुम्हाला ‘BH’ (भारत) या क्रमांकाची सिरीज असलेला नंबर देण्यात येईल, तोच नंबर तुमच्या वाहनाचे आयुर्मान असेपर्यंत असेल, तुम्हाला दुसऱ्या राज्यात पुन्हा नोंदणी करण्याची गरज भासणार नाही.
असा असेल नंबर …
दुसऱ्या राज्यात तुमच्या वाहनांची नोंदणी झाल्यावर तुम्हाला वाहन घेतल्याचे वर्ष उदा. 22 – BH- ×××× असा सुरू होऊन तुमच्या वाहनाचा जुना नंबर असलेले शेवटचे चार डिजिट दिले जातील.
नियम कुणासाठी असणार…
- BH नंबर प्लेट सुरक्षित करण्यासाठी नोंदणी १५ सप्टेंबर २०२१ पासून सुरू झाली.
- BH मालिका नंबर प्लेट्स या संरक्षण क्षेत्र आणि राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आहेत. चारपेक्षा जास्त राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यालये असलेला खाजगी क्षेत्रातील कर्मचारी देखील यासाठी पात्र आहेत.
BH नंबर प्लेट: अर्जाची किंमत
१० लाखांपेक्षा कमी किमतीच्या वाहनांसाठी, अर्जदाराला BH मालिका नंबर प्लेट अर्जासाठी वाहनाच्या किंमतीच्या आठ टक्के रक्कम भरावी लागेल. १० लाखापासून २० लाख किंमतीच्या वाहनासाठी हा दर १०% आहे. वाहनाची किंमत २० लाखांपेक्षा जास्त असल्यास, BH मालिका नंबर प्लेट मिळविण्यासाठी मालकाला वाहनाच्या किमतीच्या १२% भरावे लागतील. BH मालिका प्लेट संपूर्ण देशात वैध आहे, वाहन मालकाला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरित करताना नवीन नोंदणीसाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
Join Our WhatsApp Community