रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर हल्ला झाला आहे. पुतिन या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. मात्र रशियाने याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. पुतिन यांच्या लिमोझिन कारजवळ बॉम्ब फेकण्यात आला होता, हा हल्ला केव्हा आणि कुठे झाला याबाबतची माहिती मात्र यावेळी देण्यात आलेली नाही.युक्रेनच्या गुप्तचर संचालनालयाचे प्रमुख किरिलो बुडानोव याआधी म्हणाले होते की, दोन महिन्यांपूर्वीही पुतिन यांना मारण्याचा प्रयत्न फसला होता.
पुतिन मायदेशी परतत होते
मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, पुतिन त्यांच्या लिमोझिन कारमधून घरी परतत होते. त्यानंतर त्याच्यावर प्राणघातक हल्ला झाला. पुतिन यांच्या कारला 5 गाड्या एस्कॉर्ट करत होत्या. ताफ्यातील पहिले वाहन रुग्णवाहिकेने थांबवले. यानंतर दुसरे वाहनही अडविण्यात आले. पुतिन तिसऱ्या गाडीत बसले होते. त्यांच्या गाडीच्या डाव्या टायरजवळ मोठा स्फोट झाला आणि धुराचे लोट उडाले. त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी लगेचच कारवाई केली आणि पुतिन यांना सुरक्षितपणे दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आले.
संशयित आत्मघाती हल्ला
एका रशियन टेलिग्राम वाहिनीनुसार, हा हल्ला आत्मघातकी असू शकतो. कारण पुतिन यांच्या ताफ्याची पहिली गाडी थांबवणाऱ्या रुग्णवाहिकेचा चालक मृतावस्थेत सापडला होता. त्याचा मृतदेह सापडला. त्याचवेळी पुतिन यांना एस्कॉर्ट करत असलेल्या या पहिल्या कारमध्ये उपस्थित असलेले ३ जण बेपत्ता झाले.
पुतिन यांचा मुख्य अंगरक्षक कोठडीत
रशियन टेलिग्राम चॅनलने दावा केला आहे की, पुतिन यांच्या मुख्य अंगरक्षकासह अनेक रक्षकांना निलंबित करून ताब्यात घेण्यात आले आहे. पुतिन यांच्या हालचालींची माहिती त्यांच्या सुरक्षा रक्षकांशिवाय कोणालाही नव्हती. त्यामुळे त्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. युद्धाच्या सुरुवातीपासून म्हणजेच 24 फेब्रुवारीपासून पुतीन यांच्या 7 जवळच्या मित्रांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी बहुतेकांनी युक्रेनवरील हल्ल्याला विरोध केला.
Join Our WhatsApp Community