गोरेगाव-मुलुंड जोड रस्ते प्रकल्पाच्या तिन्ही टप्प्यातील कामांना सुरुवात होऊन दोन वर्षे उलटत आल्यानंतर आता या प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी कांजूरमार्ग पश्चिमेला सुमारे ५०० सदनिकांचे बांधकाम केले जाणार आहे. तब्बल सात विंगच्या दोन २३ मजली इमारतींचे बांधकाम करून त्यामध्ये या प्रकल्पांमधील बाधित कुटुंबांचे पुनर्वसन केले जाणार असून हे बांधकाम जून २०२४पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
( हेही वाचा : मुंबईतील विविध ठिकाणी २ ऑक्टोबरपासून पॉलिक्लिनिक सुरु; सकाळी सात ते रात्री दहापर्यंत मिळणार उपचार सेवा)
कोस्टल रोडप्रमाणे गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्प हा महापालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. पूर्व व पश्चिम उपनगरांना जोडणारा हा चौथा जोड रस्ता असून १२.२ कि.मी लांबीच्या या रस्ते प्रकल्पात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून ४.७ कि.मी लांबीचा भूमिगत बोगदा आहे. पहिल्या टप्प्यातील नाहूर रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाचे का काम प्रगतीपथावर आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील काम हे प्रस्तावित बोगद्याच्या दोन्ही बाजूंस असलेल्या जोड रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम ऑक्टोबर २०१८मध्ये हाती घेण्यात आले आहे. हे काम मार्च २०२२ रोजी पूर्ण होणे अपेक्षित आहे.
तर तिसऱ्या टप्प्यातील गोरेगाव येथे रत्नागिरी चौक येथे दिंडोशी कोर्ट ते फिल्म सिटीपर्यंत सहा पदरी उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. १.२६ कि.मी लांबीचे हे सहापदरी पुल असून रुंदी २४.२० मीटर एवढे आहे. आणि दिंडोशी कोर्ट जवळ पादचाऱ्यांसाठी लिंक रोड ओलांडण्यासाठी पादचारी पूल बांधले जाणार आहे. या तिन्ही कामांसाठी विविध करांसह ८१९.७४ कोटी खर्च करण्यात येणार आहे. यासाठी एस.पी.सिंगला कंस्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे.
सर्व सदनिका ३०० चौरस फुटांच्या असतील
मात्र, या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांचे पुनर्वसन जवळच व्हावे यासाठी महापालिकेच्यावतीने निवासी व अनिवासी सदनिकांचे बांधकाम करण्यासाठी कांजूर मार्ग पश्चिम दिशेला असणाऱ्या एलबीएस मार्गावरील एका मोकळ्या आरक्षित भूखंडावर हे बांधकाम केले जाणार आहे. २३ मजल्याच्या दोन इमारतींचा समावेश असून पहिल्या इमारतींमध्ये ए,बी,सी,डी आण इ अशाप्रकारे पाच विंग असतील तर इमारत क्रमांक दोनमध्ये एफ व जी या दोन विंग असतील. याशिवाय अंगणवाडी, बालवाडी,समाज कल्याण केंद्र, वाचनालयासह बाजार विभागाची अर्थात मार्केटची तीन मजल्याची इमारतही असेल. हा भूखंड मार्केटसाठी राखीव असल्याने याठिकाणी मार्केटची व्यवस्था केली जात आहे. या दोन्ही इमारतींच्या बांधकामासाठी सुमारे २२५ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. या सर्व सदनिका ३०० चौरस फुटांच्या असतील, अशी माहिती इमारत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
विशेष म्हणजे मागील गोरेगावमधील या प्रकल्पामुळे बाधित असलेल्या एकूण १०१ अतिक्रमणे निश्चित करण्यात आली होती, त्यातील ऑक्टोबर २०२१मध्ये ३५ बांधकामांवर कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे अन्य भागांमधील बाधित कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी या सदनिकांच्या बांधकामांकरता या दोन इमारतींचे बांधकाम हाती घेण्ण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
Join Our WhatsApp Community