राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून शेतक-यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारकडून विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. यामध्ये शेतक-यांसाठी विविध योजना सुरू करण्याचा देखील समावेश आहे. दरम्यान आता राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना देखील पाचवीपासून शेतीविषयक शिक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
शेतीविषयक शिक्षण देणार
एक दिवस बळीराजाचा या कार्यक्रमांतर्गत मी राज्यातील अनेक गावांना भेट देऊन तेथील शेतक-यांशी संवाद साधत आहे. त्यावेळी लहानपणापासूनच आपल्या मुलांना शेतीविषयक एखादा धडा किंवा एखादा विषय ठेवला तर मुलं भविष्यात तंत्रज्ञानावर आधारित शेती करू शकतील, असे आमच्या लक्षात आले. त्यामुळे अत्याधुनिक शेतीचे शिक्षण जर विद्यार्थ्यांनी पाचवीपासून बारावीपर्यंत घेतले तर त्यांना सात वर्षांच्या शिक्षणाचा अनुभव असेल. त्यामुळे असे विद्यार्थी आपल्या पायावर उभे राहतील, असे मत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले आहे.
अभ्यासक्रम ठरवणार
यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येईल. शिक्षण विभाग आणि कृषी विभागाच्या माध्यमातून याबाबतची संपूर्ण प्रक्रिया ठरवण्यात येईल. याबाबतचा अभ्यासक्रम ठरवण्यात येईल आणि त्यानुसार ही शिक्षणपद्धती लागू करण्यात येईल, असेही सत्तार यांनी स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community