राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या सौंदर्यीकरणाच्या विविध प्रकल्पांचे सादरीकरण पाहिल्यानंतर याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्यानंतर आता प्रशासनानेही यादृष्टीकोनातून पाऊल उचलले आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या सौदर्यात भर पाडण्यासाठी १४ प्रकारच्या सौदर्यीकरणाच्या प्रकल्पांची कामे हाती घेण्यात येणार आहे.यातील ५० टक्के कामे डिसेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देत महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सर्व मुद्द्यांवर कामे लवकरात लवकर सुरू करण्यासाठी जलद प्रशासकीय कार्यवाही करावी,असे निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक वर्गवारीत सर्वोत्कृष्ट काम केलेल्या विभाग कार्यालयांना पारितोषिके प्रदान करून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरवण्यात येईल, असेही आयुक्तांनी नमूद केले आहे. त्यामुळे किमान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव होण्यासाठी आता सर्व उपायुक्त व विभागीय सहायक आयुक्तांमध्ये स्पर्धा पहायला मिळणार आहे.
मुंबई सौंदर्यीकरण प्रकल्प अंतर्गत आपापल्या स्तरावर होत असलेल्या कामाचा सर्व सहायक आयुक्तांनी व संबंधित खाते प्रमुखांनी दैनंदिन आढावा घेणे आवश्यक असून सर्व परिमंडळाचे व संबंधित सहआयुक्त तथा उपायुक्तांनीही कामांचा प्राधान्याने पाठपुरावा करावा. सर्व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आणि मी स्वतः दर आठवड्याला मुंबई सौंदर्यीकरण प्रकल्पाचा आढावा घेणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
मुंबईतील सौंदर्यीकरणात अशाप्रकारे राबवले जाणार प्रकल्प
रस्त्यांचे पुनर्पृष्टीकरण:
मुंबईतील रस्त्यांवर पावसाळ्यात झालेले खड्डे भरण्याची कामे सध्या केली जात आहेत. पावसाळा संपताच रस्त्यांचे पुनर्पृष्टीकरण, दुरुस्ती हाती घ्यावी, कॉंक्रिटीकरण वगळता शिल्लक रस्त्यांवर पुनर्पुष्टीकरण लवकर पूर्ण करावे. जेणेकरून वाहतूक सुरळीत आणि सुरक्षितपणे सुरू राहील. सर्व रस्त्यांवरील झेब्रा क्रॉसिंग सुस्पष्टपणे दिसतील, अशा रीतीने रंगवावेत.
रस्ते दुभाजक:
सर्व विभाग कार्यालयांनी आपापले हद्दीत उद्यान खात्याच्या मदतीने रस्ते दुभाजकांमधील मोकळ्या जागेत सुशोभित फुलझाडांची, हिरवळीची लागवड करावी. त्यामुळे वातावरणातील धूळ आणि प्रदूषण रोखण्यासाठी मदत होईल.
पदपथ सुधारणा आणि सुशोभीकरण:
प्रत्येक विभाग कार्यालयाच्या स्तरावर किमान १५ किलोमीटर लांबीच्या पदपथांची सुधारणा आणि सुशोभीकरण करण्यात यावे. त्यात स्टॅम्प काँक्रिट, आकर्षक विद्युत दिवे, अतिरिक्त जागेत शोभिवंत कुंड्या अशा बाबींचा समावेश करून उत्कृष्ट पदपथांची निर्मिती करावी.
स्ट्रीट फर्निचर:
पदपथ आणि रस्त्यांची सुधारणा करताना आधुनिक, आकर्षक, टिकाऊ स्ट्रीट फर्निचरचा देखील त्यात समावेश करावा. विशेषतः पदपथांवर जिथे शक्य आहे तिथे नाविन्यपूर्ण, कलापूर्ण व परिसर सौंदर्य वाढविणारी आसने लावावीत. प्रमुख रस्त्यावरील पथदिव्यांचे सुशोभीकरण करावे आणि विद्युत खांबांना प्रकाश योजना करावी.
पूल आणि उड्डाणपूल:
महत्वाचे पूल निवडून त्यावर चांगली रंगसंगती निवडून रंगरंगोटी आणि विद्युत रोषणाई करावी. उड्डाणपुलांखालील जागांवर असलेले टाकाऊ साहित्य हटवून स्थानिक नागरिकांना विरंगुळा मिळेल, मुलांना खेळता येईल, आबालवृद्धांना चालता येईल, अशा रीतीने क्षेत्र निर्माण करावे. या सर्व जागा सौंदर्यात्मक पद्धतीने विकसित कराव्यात.
आकाश मार्गिका (स्कायवॉक):
मुंबई महानगरात असणाऱ्या आकाश मार्गीकांचा सर्वसामान्य नागरिकांनी उपयोग करावा, विशेषतः रात्रीच्या वेळी लोकांना त्याचा वापर करता आला पाहिजे, या दृष्टीने आकाश मार्गीकांवर स्वच्छता, रंगरंगोटी आणि विद्युत योजनेची कामे करावीत. तसेच विद्युत सुशोभीकरण देखील करावे.
वाहतूक बेटं:
प्रत्येक विभाग कार्यालयाने किमान १० वाहतूक बेटांची निवड करून त्यांचे अद्ययावतीकरण आणि सुशोभीकरण करावे. वाहतूक बेटांवर परिसर सौंदर्य वाढेल अशा रीतीने वृक्ष लागवड, हिरवळ फुलवणे, कारंजे लावणे, कलापूर्ण विद्युत संयोजना ही कामे करावीत.
समुद्रकिनारे:
मुंबईतील समुद्रकिनारे देश विदेशातील पर्यटकांसाठी देखील आकर्षणाची ठिकाणे आहेत. ही बाब लक्षात घेता समुद्रकिनाऱ्यांवर जास्तीत जास्त स्वच्छता राखून पुरेशी विद्युत व्यवस्था करणे, किनारे सुशोभित करण्यासाठी आकर्षक प्रकाशिय योजना करणे, वेगवेगळ्या कलाकृती निर्माण करणे, अशी कामे हाती घ्यावीत.
उद्याने:
मुंबईतील उद्यानांमध्ये सायंकाळी उशिरा अथवा रात्रीच्या वेळेस जाण्यासाठी सुरक्षित असावी म्हणून पुरेशी प्रकाश योजना करावी. उद्यानांमध्ये प्रकाशित पदपथ, कारंजे उभारावेत. तसेच पर्यटकांना आणि लहान मुलांना आकर्षणाचे ठिकाण बनू शकेल अशी प्रकाशित उद्यानं (glow garden) तयार करावीत.
डिजिटल जाहिरात फलक:
जगभरात आता पारंपरिक जाहिरात फलकांच्या ऐवजी डिजिटल जाहिरात फलक (Digital Hoarding) उभारण्यात आले आहेत. मुंबईतील सर्व अधिकृत जाहिरात फलक येत्या ६ महिन्यात टप्प्याटप्प्याने डिजिटल जाहिरात फलकांमध्ये रूपांतरित करण्यात यावेत. प्रामुख्याने पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्ग या दोन्ही महत्त्वाच्या रस्त्यांवरील सर्व जाहिरात फलक १०० टक्के डिजिटल करण्यात यावेत. डिजिटल जाहिरात फलक कमी वेळेमध्ये बदलता येतात आणि अधिक आकर्षक असल्याने अधिक उत्पन्न देणारे ठरतात. त्यासाठी नवीन जाहिरात धोरण लवकर तयार करावे.
किल्ल्यांवरील रोषणाई:
मुंबई महानगराला इतिहासाचा वारसा असून महानगरात असलेल्या किल्ल्यांवर विद्युत रोशणाई करण्यात यावी, त्यातून पर्यटनाला अधिक चालना मिळेल.
भारताचे प्रवेशद्वार (गेटवे ऑफ इंडिया) परिसराचे सुशोभीकरण हाती घेण्यात यावे.
मियावाकी वृक्ष लागवड:
मुंबईत मियावाकी पद्धतीने आतापर्यंत सुमारे चार लाख वृक्ष लागवड करण्यात आली आहे. आणखी १ लाख वृक्ष लागवड याच पद्धतीने करण्यात यावी.
सार्वजनिक ठिकाणी आणि पायाभूत सुविधांची स्वच्छता:
संपूर्ण महानगरातील पदपथ, दुभाजक, भिंती, रस्त्यांवरील फलक, ध्वनिरोधक, स्वीट फर्निचर, पुलांचे भाग आदींच्या स्वच्छतेसाठी यांत्रिक स्वच्छता उपकरणांचा वापर करावा. त्यामुळे वेगाने स्वच्छता करून धुळीचे प्रमाण कमी करणे, हवेची गुणवत्ता सुधारणे, परिसर सौंदर्य वाढवणे इत्यादी हेतू साध्य करता येतील. सार्वजनिक ठिकाणी विशेषतः झोपडपट्टी परिसरांमध्ये कचरा संकलनाच्या डब्यांची संख्या वाढवावी.
सुविधा केंद्र:
मुंबईत दररोज लाखोंच्या संख्येने इजा करणारी लोकसंख्या, झोपडपट्टी व तत्सम परिसरांमध्ये राहणारे नागरिक यांच्या सोयीसाठी सुविधा केंद्रं उभारावीत. यामध्ये स्वच्छ आणि दुर्गंधी मुक्त प्रसाधनगृह, गरम व थंड पाण्याच्या सुविधेसह स्नानगृह, पिण्याचे शुद्ध पाणी, सौर ऊर्जा पुरवठा अशा सुविधांचा समावेश करून ही केंद्र बांधण्यात यावीत.
सार्वजनिक भिंतींचे कलात्मक सुशोभीकरण:
मुंबईतील महत्त्वाच्या व प्रमुख भागांमधील सार्वजनिक भिंतीवर कलात्मक पद्धतीने चित्रे रंगवून सुशोभीकरण करावे. प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीत किमान १० ते १२ भिंतींची रंगरंगोटी करावी.
Join Our WhatsApp Community