महाराष्ट्रातील मराठवाडा हा सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे. सर्वच बाबतीत मराठवाड्याचा फार मोठा वाटा आहे. त्यामुळे मराठवाड्यासारखा इतका महत्वाचा प्रदेश महाराष्ट्रात सहभागी होण्यामागे फार मोठा इतिहास आहे. मराठवाड्याच्या जनतेला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारताच्या स्वातंत्र्यानंतरही लढा द्यावा लागला होता.
निजामाविरोधात दिलेल्या या लढ्यात अनेकांना बलिदान देखील द्यावे लागले होते. 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो.
निजामाचा कपटी डाव
15 ऑगस्ट 1947 रोजी भारताने स्वातंत्र्य मिळवले. पण तरीही सध्याच्या भारतात असलेल्या हैद्राबाद,काश्मीर आणि जुनागढ या तीन संस्थानांनी स्वतंत्र भारतात सहभाग घेण्यास नकार दिला होता. हैद्राबादचा निजाम मीर उस्मानअली खान हा 1911 ते 1948 या काळात सत्तेवर असलेला शेवटचा निजाम होता.
स्वतंत्र हैद्राबाद स्थापन करुन नंतर ते पाकिस्तानात विलीन करण्याचा डाव निजामाचा होता. त्यामुळे त्याने आपण सार्वभौम असल्याचे इंग्रज सरकारला पत्राद्वारे आधीच कळवले होते. त्यावेळच्या हैद्राबाद संस्थानात एकूण 8 तेलगू भाषिक जिल्हे,3 कानडी भाषिक जिल्हे आणि 5 मराठी भाषिक जिल्हे(मराठवाडा) यांचा समावेश होता.
मुक्तिसंग्राम आणि मराठवाड्याचे योगदान
हैद्राबादला इस्लामी राष्ट्राचे स्वरुप देण्याचा नवाबाचा विचार होता. त्यासाठी त्याने ऊर्दू हे शिक्षणाचे माध्यम केले होते व इस्लाम हा राज्याचा धर्म म्हणून घोषित केला होता. स्वतंत्र भारताच्या प्रदेशात असलेल्या हैद्राबादमध्ये अशाप्रकारे होत असलेले इस्लामीकरण हे त्यावेळच्या हिंदूंना मान्य नव्हते. त्यामुळेच त्यांनी हैद्राबाद मुक्तिसंग्रामाची सुरुवात केली. यामध्ये मराठवाड्याचे योगदान देखील फार मोठे होते.
वंदे मातरम् आंदोलन
14 नोव्हेंबर 1938 मध्ये संभाजीनगर(तत्कालीन औरंगाबाद)च्या इंटरमिजिएट कॉलेजच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी वंदे मातरम् गीत म्हणण्यास सुरुवात केली. तिथल्या प्राचार्यांनी हे गीत म्हणण्यास बंदी घातल्यानंतर विद्यार्थ्यांनी वसतिगृहात उपोषणाला सुरू केले. या घटनेचे लोण हैद्राबाद येथे पोहोचले आणि तेथील विद्यार्थ्यांनी देखील वसतीगृहांमध्ये वंदे मातरम् गीताचा जप सुरू केला.
ऊर्दू माध्यमाची सक्ती,मातृभाषेला देण्यात येणारे दुय्यम स्थान,गणवेशाची सक्ती यांमुळे हे आंदोलन पेटून उठले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर,सुभाषचंद्र बोस यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. या आंदोलनामुळे हैद्राबाद मुक्तिसंग्रामाची ठिणगी पडली.
रझाकारांचे अत्याचार
निजामाला हैद्राबादमधील हिंदुंनी जोरदार विरोध करायला सुरुवात केली. या वाढत्या विरोधाला आळा घालण्यासाठी निजामाने 1940 साली कासीम रझवी याच्या नेतृत्वात रझाकार संघटनेची स्थापना केली. या संघटनेने निजामाची सत्ता टिकावी म्हणून हैद्राबाद संस्थानात धुमाकूळ घातला.
या रझाकारांची संख्या 2 लाख इतकी होती. बलात्कार,खून,लूटमारी,जाळपोळ असे अत्याचार या रझाकारांकडून हैद्राबादमधील जनतेवर करण्यात येत होते. अत्याचार करत सक्तीचे धर्मांतरण देखील रझाकार करत असत. या संघटनेला पाकिस्तानातूनही शस्त्रसाठा पुरवण्यात येत होता.
रझाकारांविरोधात लढा
रझाकारांच्या या जाचामुळे हैद्रबादमधील जनता अधिक पेटून उठली. हैद्राबाद स्टेट काँग्रेसचे अध्यक्ष स्वामी रामानंद तीर्थ यांनी जहाल भूमिका घेत हैद्राबाद संस्थान भारतात यायला हवे, असे सांगितले. निजामापासून स्वतंत्र होण्यासाठी जो काही लढा द्यायचा तो आताच द्या, असे रामानंद तीर्थ यांनी जनतेला आवाहन केले. त्यांच्या या आवाहनामुळे संपूर्ण संस्थानात एक विलक्षण शक्ती संचारली.
60 रझाकार केंद्रांवर जनतेने हल्ले केले. तब्बल 250 खेड्यांनी निजामी सत्ता झुगारुन स्वातंत्र्य पुकारले होते. या लढ्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात 11,बीड जिल्ह्यात 21,नांदेड जिल्ह्यात 37,परभणी जिल्ह्यात 30 तर संभाजीनगर(तत्कालीन औरंगाबाद) जिल्ह्यात 10 जणांनी या मुक्तिसंग्रामात हौतात्म्य पत्करले.
‘ऑपरेशन पोलो’ने मुक्तिसंग्राम यशस्वी
अखेर रामानंद तीर्थ यांनी दिल्लीत जाऊन हैद्राबाद संस्थानात फौजा पाठवणे आवश्यक असल्याचे केंद्र सरकारला पटवून दिले. हैद्रबादचा निजाम हा लष्करी कारवाईशिवाय वठणीवर येणार नाही, असे त्यांनी सरकारला पटवून दिले. त्यानंतर भारत सरकारने 13 ते 17 सप्टेंबर 1948 या काळात हैद्राबाद संस्थानावर लष्करी कारवाई केली. या कारवाईला ऑपरेशन पोलो असे नाव देण्यात आले.
लेफ्टनंट जनरल राजेंद्रसिंह यांच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्कराने हैद्राबाद विलीनीकरणाची कारवाई पूर्ण केली. या कारवाईनंतर निजामाने बिनशर्त शरणागती पत्करली. त्यानंतर हैद्राबाद संस्थानाचे तेलंगणा,कर्नाटक आणि मराठवाडा असे विभाजन करुन ते अनुक्रमे आंध्र प्रदेश,कर्नाटक आणि महाराष्ट्रास जोडण्यात आले.
Join Our WhatsApp Community