‘त्या’ आदिवासी मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जेजे रुग्णालयात आणला, पण…

166

नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी महिलेच्या आत्महत्या प्रकरणाला शुक्रवारी, १६ सप्टेंबर रोजी वेगळे वळण मिळाले. कुटुंबियांनी महिलेच्या मित्रावर बलात्काराचा आरोप केल्याने मुलीचा मृतदेह जाळण्यास नकार देत मिठाच्या ढिगा-यातच महिन्याभराहून अधिक काळ पुरला होता. या प्रकरणाची बोंब होताच पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी गुरुवारी रात्री भायखळा येथील जेजे रुग्णालयात आणला. या शवविच्छेदनाचा अहवाल मात्र रुग्णालय प्रशासनाने गुप्त ठेवला आहे.

काय आहे प्रकरण?

नंदुरबार येथील धडगाव भागांतील आदिवासी महिलेने २ ऑगस्ट रोजी आत्महत्या केली. कुटुंबियांच्या आरोपानुसार, त्यांच्या मुलीवर बलात्कार झाला असून, मुलीवर बलात्काराचा आरोप सिद्ध करण्यासाठी तिचा मृतदेह मिठाच्या थरांसह जमिनीत महिन्याभराहून अधिक काळ गाडून ठेवला. मृत महिला ही विवाहित असून, तिने आपल्या पतीसह घटस्फोट घेण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. माहेरी परतल्यानंतर तिची शेजारच्या तरुणाशी मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. ही बाब कुटुंबियांना समजताच मुलाकडेच्या कुटुंबियांना बोलावून १५ हजार रुपये देत प्रकरण मिटवण्यास सांगितले. आपला प्रेमभंग झाल्याचे समजताच १ ऑगस्ट रोजी महिलेने आत्महत्या केली. महिलेच्या कुटुंबियांनी मात्र तिच्या प्रियकरावर बलात्कार आणि खुनाचा आरोप केला.

(हेही वाचा :हैदराबाद मुक्ती संग्राम : भाजपा आणि TRS येणार आमनेसामने)

मृत मुलीचे दफन केले 

महिलेचा मृतदेह महिन्याभराहून अधिक काळ जमिनीत मिठाच्या थरांत गाडल्याची बातमी प्रसारमाध्यमांकडून सगळीकडे पसरली. पोलिसांनी गुरुवारी रात्री जेजे रुग्णालय गाठले. रात्री अडीच वाजता महिलेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या गळ्यावर फास लावल्याच्या खुणा आहेत. मात्र बलात्कार झाल्याचे सिद्ध करण्यासाठी फॉरेन्सिक प्रयोगशाळेची पोलिसांनी मदत घेतली आहे.. शुक्रवारी मृत आदिवासी महिलेवर सर्व धार्मिक संस्कार करुन तिला प्रथेनुसार जमिनीत पुरण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.