सध्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जोरदार चर्चा सुरु आहे. शिवसेनेने दसरा मेळाव्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान अर्थात शिवाजी पार्क येथे परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे, मात्र अद्याप महापालिकेने परवानगी दिली नाही, तरीही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विभागप्रमुख आणि उपविभागप्रमुख यांची शिवसेना भवनात बैठक घेऊन दसरा मेळावा शिवतीर्थावरच होईल, तयारीला लागा, असा आदेश दिला असल्याचे समजते.
शनिवारी, १७ सप्टेंबर रोजी शिवसेना भवन येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्क येथेच होणार आहे, त्यासाठी विभागप्रमुख आणि उपविभागप्रमुख यांनी तयारी करावी, असे सांगितले असल्याचे विभागप्रमुख मंगेश सातमकर यांनी म्हटले.
(हेही वाचा याआधी शिवसेनेची दसरा मेळाव्याची ‘तोफ’ शिवाजी पार्कमध्ये कितीवेळा थंडावलेली?)
शिवसेनेचा महापालिकेवर दबाव!
तर दुसरीकडे उपविभागप्रमुख मिलिंद वैद्य यांनी महापालिकेला पत्र लिहून दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये घेण्यासाठी परवानगी कधी देणार, अशी विचारणा केली आहे. शिवसेनेने दसरा मेळावा शिवाजी पार्क येथे घेण्यासाठी परवानगी द्यावी याकरता २२ आॅगस्ट रोजी महापालिकेला पत्र दिले होते. त्यावेळी सहाय्यक आयुक्तांनी संध्याकाळी लेखी परवानगी देऊ, असे म्हटले होते. मात्र अजून त्यांची संध्याकाळ झाली नाही. त्यामुळे अखेर शनिवारी, ११ सप्टेंबर रोजी आम्ही पुन्हा महापालिकेच्या साहाय्यक आयुक्तांची भेट घेतली. मात्र त्यांनी आम्ही याबाबत विधी विभागाचे मत मागवले आहे, असे सांगितले आहे. आजवर असे कधीच घडले नव्हते. ज्याचा पहिला अर्ज येईल त्याला परवानगी दिली जाते, अशीच पद्धत आहे. त्यामुळे आम्ही महापालिकेला लेखी म्हणणे मागितले आहे, जेणेकरून उद्या यावर न्यायालयात बाजू मांडणे सोपे जाईल, असे वैद्य म्हणाले.
Join Our WhatsApp Community