दक्षिण मुंबईतील पूर्व व पश्चिम जोडणाऱ्या परेल उड्डाणपुलाची पसरण सांध्यांची संख्या कमी करून पुलाचे नुतनीकरण करावे, असे एका अभ्यासात पुढे आहे. त्यादृष्टीकोनातून या पुलाची डागडुजी महापालिका हाती घेत असल्याचे बोलले जात आहे. या पुलाच्या पसरण सांध्यासह इतर कामांसाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच या पुलाच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात येणार असून तसे झाल्यास लोअर परेल पाठोपाठ या पुलाचेही बांधकाम हाती घेत वाहतुकीसाठी काही भाग बंद केल्यास पुलकोंडी होणार तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
( हेही वाचा : टिळक नगर, चेंबूर, मानखुर्दमधील नाल्यांवरील पुलांची पुनर्बांधणी)
मुंबईतील अनेक पुल ही धोकादायक अवस्थेत असल्याने पुनर्बांधकामाकरता काही पुले ही अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आली आहेत, तर काही पुले ही बंद करण्यात आली आहे. ब्रिटीशांनी बांधलेल्या हँकॉक पुलांचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात आले आहे तर कर्नाक पूल हे बांधकामाकरता तोडण्यात येत आहे. तर टिळक पुलांचे बांधकाम महापालिकेच्या हद्दीत महापालिकेने सुरुवात केले आहे आणि रेल्वे हद्दीतील पुलाचे बांधकाम लवकरच केले जाणार आहे. त्यामुळे परेलच्या पुलावरील भार आता वाढणार असून त्यादृष्टीकोनातून या पुलाची मलमपट्टी करून त्यांच्या पसरण सांध्यांची विशेषत: डागडुजी करण्याचे काम हाती घेण्यात येत आहे.
दक्षिण मुंबईतील परेल आणि प्रभादेवी अशाप्रकारे पूर्व पश्चिम जोडणारे रेल्वे पूल हे १९६८मध्ये बांधण्यात आले आहे. या पुलाच्या बांधकामाला ५५ वर्षे पूर्ण होत असून या पुलावर १० मीटर अंतरावर पसरण सांधे बसवण्यात आले आहे. अशाप्रकारे एकूण २२ पसरण या पुलावर असून यामुळे पुलावरुन अवजड होत असल्याने धोका निर्माण होतो. तसेच सततच्या वाहतुकीमुळे पडणारे खड्डे लक्षात घेता महापालिकेच्यावतीने याची नियमित देखभालीच्या दृष्टीकोनातून पसरण सांध्यांसह इतर भागांची डागडुजी करण्यात येणार आहे. यासाठी तब्बल विविध करांसह २१ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. पावसाळा वगळून या पुलाचे बांधकाम करण्यासाठी एम ई इन्फ्राप्रोजेक्ट या कंपनीची निवड करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी पुलाच्या पाहणी अभ्यासात असा निष्कर्ष नोंदवण्यात आला होता की उड्डाणपुलाची पसरण सांध्यांची संख्या कमी करून पुलाचे नुतनीकरण करावे. त्यादृष्टीकोनातून या पुलाची डागडुजी महापालिका हाती घेत असल्याचे बोलले जात आहे.
लोअर परेलचे पूलाचे बांधकाम करण्यात येत असल्याने ते पाडून त्याठिकाणी पुनर्बांधकाम करण्यात येत आहे. त्यामुळे परेल,लालबाग, शिवडी, लोअर परेल, प्रभादेवी आदी भागांमधील पूर्व पश्चिम दिशेला जाण्यासाठी परेल पुलाचा वापर करता. टिळक पुलावरील वाहनांची कोंडी लक्षात घेता या पुलावर मोठ्याप्रमाणात वाहनचालकांची गर्दी होते, त्यामुळे संध्याकाळी या पुलावर प्रचंड वाहनकोंडी निर्माण होत असते. मात्र, यापुलाची डागडुजी असल्याने प्रशासनाने या पुलाचेही काम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका पूल विभागाचे प्रमुख अभियंता सतीश ठोसर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी परेल पुलाच्या ठिकाणी नियमित डागडुजीच्या कामासाठी कंत्राटदाराची नेमणूक केली असून त्यामध्ये प्रसरण सांध्यांची तपासणी करून त्याप्रमाणे त्यांची दुरुस्ती केली जाईल. शिवाय पृष्ठभागाचेही सपाटीकरण केले जाईल. भविष्यात दादर टी टी पूल वाहतुकीसाठी बंद झाल्यास परेल पुलावरील वाहतूक अधिक प्रमाणात वाढेल. त्यादृष्टीकोनातून ही डागडुजी केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community