राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे गटाकडून सातत्याने राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करण्यात येत आहे. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे जर बोलायला शब्द नसतील तर त्यांनी मला फोन करावा मी त्यांना कसं बोलायचं ते सांगेन, अशा शब्दांत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.
भारतातून नामशेष झालेल्या चित्त्यांचे तब्बल 70 वर्षांनंतर पुन्हा एकदा भारतात आगमन झाले. मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय अभयारण्यात 8 चित्त्यांचे सरकारकडून पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यावरुन भाजपला आता चित्ते सरकार म्हणायचं का, अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी केली. त्याला नारायण राणे यांनी उत्तर दिले आहे.
उद्धव ठाकरेंना चांगलं बोलता येत नाही
उद्धव ठाकरेंकडे बोलायला वाक्य नसतील तर त्यांनी मला फोन करावा मी त्यांना सांगेन की अशा प्रसंगी काय बोलावं. चांगल्या गोष्टींचे कधीही कौतुक करावे. भारतात चित्ता हा प्राणी नव्हता, पण मोदी सरकारने त्याचे पुनर्वसन केले. त्याबाबत मोदी सरकारचे आभार मानायला हवे आणि त्यांचे धन्यवाद व्यक्त करायला हवेत. पण उद्धव ठाकरेंना चांगलं बोलताच येत नाही, त्याला आमचा नाईलाज आहे, अशी बोचरी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे.
त्यांचं अस्तित्व मातोश्रीपुरतं
मुख्यमंत्री पदावरुन उतरल्यानंतर उद्धव ठाकरे यांचे अस्तित्व आता संपले आहे. उद्धव ठाकरेंचे अस्तित्व हे महाराष्ट्र आणि देशात कुठेही नसून केवळ मातोश्रीच्या कक्षेत आहे, असा झणझणीत टोलाही नारायण राणे यांनी यावेळी लगावला आहे.
Join Our WhatsApp Community