गोरेगाव पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अद्याप दिलासा मिळाला नसल्याचे समोर आले आहे. कारण संजय राऊतांचा आर्थर रोड कारागृहामधील मुक्काम वाढला आहे. न्यायालयाने संजय राऊत यांच्या कोठडीत पुन्हा १४ दिवसांची वाढ केली असून ४ ऑक्टोबरपर्यंत त्यांचा मुक्काम न्यायालयीन कोठडीत असणार आहे.
(हेही वाचा – वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प वादावर राज ठाकरेंचा हल्लाबोल, स्पष्टचं म्हणाले…)
याप्रकरणी ईडीकडून आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे. मात्र जोपर्यंत आरोपपत्राची प्रत मिळत नाही, तोपर्यंत या खटल्याची सुनावणी रोज सातत्याने चालणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, ईडी कायम आरोपींना आरोपपत्र देण्यास टाळत असल्याचे निदर्शनास आल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.
न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला
गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना जूनमध्ये ईडीने अटक केली होती. त्यानंतर राऊतांना न्यायालयाकडून न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर राऊत यांचा मुक्काम आर्थर रोड कारागृहात हलवण्यात आला. आज, सोमवारी राऊत यांना पीएमएलए न्यायालायत हजर करण्यात आले होते. यानंतर संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. नियमित आणि जामीन अर्ज सुनावणी एकाच वेळी घ्यावी, अशी विनंती राऊतांच्या वकिलांनी केली होती. मात्र न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली आहे. त्यामुळे सप्टेंबर महिना राऊतांना कारागृहात काढावा लागणार आहे.
काय आहे प्रकरण
पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात ईडीने संजय राऊत यांच्या पत्नीची देखील चौकशी सुरू केली होती. तसेच राऊत यांचा निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना देखील अटक करण्यात आली होती. प्रवीण यांच्या मदतीने राऊत यांनी हा गैरव्यवहार केला. यानंतर मनी लॉंड्रिंगची रक्कम तपासण्याचे काम सुरू असल्याचे ईडीकडून सांगितले जात आहे. या व्यवहारात प्रवीण राऊत यांनी मिळालेली रक्कम संजय राऊत यांच्या पत्नीच्या बॅंक खात्यात वर्ग केली आहे. तसेच त्यातून राऊत यांनी अलिबागमध्ये जमीन खरेदी केल्याचा आरोप देखील ईडीने केला आहे. तर ईडीने ३१ जुलै रोजी संजय राऊत यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप चुकीचे असल्याचे सांगत त्याचे खंडन केले असून राजकीय आकसाने आपल्याविरोधात खोटे आरोप केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
Join Our WhatsApp Community