सणासुदीच्या दिवसात आपण नवनवीन वस्तू विकत घेऊन आपले घर सजवतो, आता नवरात्रीनंतर लगेचच देशभरातील लोक दिवाळीच्या तयारीला लागतील. अलिकडे सोयीस्कर आणि घरपोच वस्तू मिळत असल्याने ऑनलाईन शॉपिंगला जास्त प्राधान्य दिले जाते. त्यामुळे लोकप्रिया ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर सध्या सेल सुरू झाले आहेत. यामध्ये आपल्याला उत्पादनांवर Discount मिळतो. चांगल्या सवलती, ऑफर आणि कॅशबॅक मिळत असल्याने अनेक लोक या सेलमध्ये खरेदी करतात. परंतु ऑनलाईन खरेदी करण्यापूर्वी तुम्ही काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवल्या पाहिजेत. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया…
( हेही वाचा : समृद्धी महामार्गाच्या सुसाट प्रवासासाठी नेमका किती टोल भरावा लागणार? जाणून घ्या )
ऑनलाईन शॉपिंग करताना या गोष्टींची काळजी नक्की घ्या…
- स्मार्टफोन, मोबाईल, लॅपटॉप यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करताना तुम्ही या वस्तू नेमक्या कधी लॉंच झाल्या आहेत ते तपासून घ्या. या उत्पादनांमध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर नवे वापरले आहेत का याची खात्री करा. अनेक कंपन्या जुन्या डिव्हाईसवर अधिक सूट देऊन युजर्सला आकर्षित करतात. म्हणूनच कोणतेही उत्पादन घेण्यापूर्वी माहिती घेणे आवश्यक आहे.
- इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विकत घेताना एकदा त्या उत्पादनांच्या Official Website वर किंवा इंटरनेटवर त्यांची किंमत तपासून घ्या.
- केवळ Discount वर आकर्षित होऊन खरेदी करू नका. तुम्हाला त्या वस्तूची खरंच गरज आहे का याची खात्री करा.
- कपडे किंवा इतर शोभेच्या वस्तू घेताना त्यांचे reviews तपासून बघा. विशेषत: कपडे घेताना एकदा साईज चार्ट, कपड्याचे मटेरिअल याबाबत संपूर्ण डिटेल्स नमूद आहेत का ते पहा त्यानंतरच खरेदी करा.
- दिवाळीत पणत्या, घर सजावटींच्या वस्तूंची नेमकी बाजारात तसेच इंटरनेटवर किती किमती आहेत ते तपासूनच ऑर्डर करा.