‘ग्रामपंचायतींमधील विजय ही महापालिका निवडणुकांमधील विजयाची नांदी’, फडणवीसांचे सूचक वक्तव्य

169

राज्यात झालेल्या सत्तांतरणानंतर राज्यातील वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिंदे गट आणि भाजप एकत्र निवडणुका लढणार असल्याचे सांगण्यात येत असतानाच आता राज्यातील 547 ग्राम पंचायत निवडणुकांचे निकाल हाती येत आहेत. या निवडणुकांमध्ये शिंदे गट आणि भाजपने मिळून 300 हून अधिक जागा मिळवल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तर ही महापालिका निवडणुकांमधील विजयाची नांदी असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

ही भविष्याची नांदी

या ग्रामपंचायत निवडणुकांनी शिवसेना आणि भाजप युतीवर शिक्कामोर्तब केले आहे. हा शिंदे गट नाही तर ही खरी शिवसेना आहे. तिकडे फक्त शिल्लक सेना आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांवर चालणारी सध्या भाजपसोबत असून त्यांना लोकांनी स्वीकारले आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये आमच्या युतीने 300 पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे ही भविष्याची नांदी आहे. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये सुद्धा तुम्हाला आमच्याच युतीचा विजय झालेला दिसेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

(हेही वाचाः ‘जर महाराष्ट्रातील वातावरण बिघडले तर त्याला राज्य सरकार जबाबदार’, शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यावरुन खैरेंचा इशारा)

कोस्टल रोडच्या कामाला गती देणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील कोस्टल रोडची पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते. कोस्टल रोड हा मुंबईचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. गेल्या 25 वर्षांपासून या प्रकल्पाची मागणी करण्यात येत होती. पण ही संकल्पना कधीच अस्तित्वात येताना दिसत नव्हता. जेव्हा 2014 मध्ये भाजपचं सरकार आलं त्यावेळी केंद्र सरकारकडून या प्रकल्पासाठी परवानगी मिळवण्यात आली. त्यानंतर याचं काम सुरू झाले असून आता पुन्हा एकदा राज्य सरकारने या प्रकल्पाला गती देण्याचे ठरवले आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.