२०२३ अखेर कोस्टल रोड पूर्ण होणार, मुख्यमंत्र्यांचा विश्वास

167

मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) अर्थात मुंबई कोस्टल रोडचे सुमारे ६२ टक्के काम पूर्ण झाले असून, पुढील वर्षाअखेरीस हा प्रकल्प पूर्ण होईल. त्यामुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी व्यक्त केला.

मुंबई कोस्टल रोडच्या प्रगतिपथावर असलेल्या कामाची पाहणी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सायंकाळी केली. प्रकल्पाच्या प्रियदर्शिनी उद्यान (नेपियन सी) येथील कार्यालयात मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे), अश्विनी भिडे यांनी प्रकल्पाचे सादरीकरण केले. मुंबईकरांसाठी स्वप्नवत असलेला हा प्रकल्प वेळेत पूर्ण करुन त्यांचा प्रवास अधिक गतिमान करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी प्रियदर्शिनी पार्क येथील भूमिगत बोगदा, हाजी अली आणि वरळी येथील आंतरमार्गीका बदल (इंटरचेंज) सह संपूर्ण प्रकल्प रस्त्याची पाहणी केली. या वेळी खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, आमदार प्रकाश सुर्वे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा, उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) अजय राठोर, प्रमुख अभियंता (किनारी रस्ता प्रकल्प, (प्रभारी) मांतय्या स्वामी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

…असा असेल कोस्टल रोड

  • एकूण १०.५८ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाचे बांधकाम प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे – वरळी सागरी सेतूच्या (सी लिंक) दक्षिण टोकापर्यंत करण्यात येत आहे. प्रकल्पामध्ये ४+४ मार्गिका असणारे भरणीवरील रस्ते, पूल, उन्नत रस्ते आणि बोगदे यांचा समावेश आहे.
  • किनारी रस्ता प्रकल्पाचे काम प्रत्यक्ष ऑक्टोबर, २०१८ मध्ये सुरु झाले असून नोव्हेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पामुळे रस्ते प्रवासाचा वेळ कमी होऊन विद्यमान रस्त्यांवरील वाहतुकीची समस्या निवारणासाठी मदत होणार आहे.
  • शिवाय वायू आणि ध्वनी प्रदूषणाची पातळी देखील कमी होईल. त्यासोबत समर्पित बस मार्गिकेद्वारे सार्वजनिक वाहतुकीमध्ये सुधारणा होऊन अतिरिक्त हरित पट्टयांची निर्मिती देखील होणार आहे.
  • एकूण तीन पॅकेजमध्ये हा संपूर्ण प्रकल्प विभागलेला आहे. किनारी रस्त्यामुळे वेळेत ४० टक्के, तर इंधनात ३४ टक्के बचत होणार आहे. हरित क्षेत्रामध्ये- सायकल ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक, खुले प्रेक्षागृह, फुलपाखरु उद्यान, जैव वैविध्यता उद्यान इत्यादी बाबी अंतर्भूत आहेत. प्रकल्पामध्ये ८.५ कि.मी.चा सागरी पदपथ निर्मिती.
  • किनारी रस्त्यावर समर्पित बस वाहतूक योजिले असल्याने वाहतूक कोंडी कमी होण्यात मदत होईल व संरक्षित, जलद आणि परवडणारा प्रवास करता येईल. रुग्णवाहिन्यांसाठी जलद प्रवास.
  • प्रस्तावित सागरी तटरक्षक भिंतींची योजना केल्यामुळे सध्याच्या सागरी किनाऱ्याची धूप होण्यापासून, वादळी लाटा व पुरापासून संरक्षण मिळेल.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.