राज्यात सत्तांतरानंतर ‘खोके आणि ओके’ वरून एकमेकांना भिडणारे आमदार आता चक्क गळ्यात गळे घालून परदेश भ्रमंती करताना दिसणार आहेत. शासकीय अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने सर्वपक्षीय १६ आमदार परदेशात जात असून, तब्बल १० दिवस ते एकत्र राहणार आहेत.
( हेही वाचा : आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर कैलास राजपूतला भारतात आणण्यासाठी हालचाली)
कोरोनापश्चात आमदारांचा हा पहिला शासकीय परदेश दौरा आहे. या अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने इस्त्राईल, दुबई आणि फ्रान्सची सफर ते करतील. शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर राज्यात ‘खोके आणि ओके’ वरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. अधिवेशनकाळात विरोधकांनी ‘५० खोके, एकदम ओके’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.
यादरम्यान विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधक आमदार एकमेकांना भिडलेही होते. आता परदेश दौऱ्याच्या निमित्ताने हेच आमदार गळ्यात गळे घालून एकत्र ‘अभ्यास’ करणार आहेत.
कोणाकोणाचा समावेश?
आमदार प्रशांत बंब, सुरेश भोळे, मेघना बोर्डीकर, यामिनी जाधव, सदा सरवणकर, राजेंद्र यड्रावरकर, कैलाश घाटगे पाटील, अनिल पाटील, चंद्रकांत नवघरे, यशवंत माने, संग्राम थोपटे, मोहनराव हंबर्डे, गोपीचंद पडळकर, अमोल मिटकरी, अभिजीत वंजारी, श्वेता महाले यांचा त्यात समावेश आहे. त्यांच्यासोबत विधान परिषद आणि विधानसभेचे सचिवदेखील असतील.
Join Our WhatsApp Community