शिवसेनेतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उठावानंतर शिंदे गट आणि ठाकरे गटात जोरदार आरोप-प्रत्योराप सुरू आहेत. यामध्ये अनेकदा एकमेकांवर आक्षेपार्ह शब्दांत टीका करण्यात येत आहे. शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी दापोली येथे केलेल्या भाषणात उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा उल्लेख केल्यामुळे त्यांच्या विधानाचा जाहीर निषेध करण्यात येत आहे. पण याबाबत आता रामदास कदम यांनी दिलगिरी व्यक्त करत आपले शब्द मागे घेतले आहेत.
मी माझे शब्द मागे घेतो
उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे शिवसेनेच्या मंचावर कशासाठी येतात, असे विधान रामदास कदम यांनी दापोली येथे केले होते. यावरुनच आता रामदास कदम यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मी रश्मी ठाकरे यांच्याबद्दल असं बोलायला नको होतं. त्यांच्याबद्दल असं बोलण्याची आवश्यकता नव्हती. त्या उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आहेत. अनेक मुख्यमंत्र्यांच्या पत्नी मंचावर येतात त्यामुळे रश्मी ठाकरे यांच्याबाबत मी अनावधानाने बोलून गेलो त्याबाबत मी माझे शब्द मागे घेतो, असे रामदास कदम यांनी म्हटले आहे.
(हेही वाचाः ‘…तर आम्हीही ठाकरे गटाचं दसरा मेळावा घेण्यासाठी स्वागत करू’, शिंदे गटाचे आवाहन)
म्हणून मी आदित्य ठाकरेंच्या लग्नाबाबत बोललो
रामदास कदम यांनी आदित्य ठाकरे यांच्या लग्नाबाबत देखील सभेमध्ये विधान केले होते. त्याचा खुलासाही रामदास कदम यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांनी आता महाराष्ट्रात जी भाषणं केली त्यामध्ये शिंदे गटातील आमदारांना गद्दार आणि खोके म्हटले. तुम्ही अडीच वर्ष राज्यात मंत्री होतात तुमचे वडील मुख्यमंत्री होते या अडीच वर्षांत तुम्ही शेतकरी, आदिवासी, बेरोजगारांसाठी काय केलंत याबाबत त्यांनी लोकांना सांगायला हवे होते. म्हणून आदित्य ठाकरेंनी आधी लग्न करावं मुलंबाळं झाली की मग संसार काय असतो ते कळेल, असं मी म्हणालो होतो, असा खुलासा रामदास कदम यांनी केला आहे.
Join Our WhatsApp Community