रशिया-युक्रेन युद्धात रशिया एका आठवड्यात युक्रेनला नेस्तनाबूत करेल, अशी शक्यता वर्तवणाऱ्या तज्ज्ञांसाठी या युद्धाची आजची ताजी स्थिती धक्कादायक आहे. तब्बल सहा महिने हे युद्ध सुरु आहे. तरीही रशिया युक्रेनला हरवू शकली नाही. आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी रशियाच्या सीमा असुरक्षित बनल्या तर रशियासाठी सर्व पर्याय खुले आहेत. आम्ही आमच्या नागरिकांच्या रक्षणासाठी कोणताही निर्णय घेऊ असे सांगत पुतीन यांनी अप्रत्यक्षपणे अण्वस्त्र युद्धाची धमकी दिली आहे. तसेच ३ लाखांच्या राखीव फौजा बाहेर काढल्या आहेत.
नागरिकांच्या रक्षणासाठी सर्व पर्याय खुले
रशियाची तब्बल तीन लाखांची राखीव फौज पुतीन यांनी युक्रेन सीमेवर तैनात करण्यासाठी हलवली आहे. पाश्चात्य राष्ट्रांकडून रशियाला धोका असल्याचे सांगत हा निर्णय घेतल्याचे पुतीन यांनी म्हटले आहे. याआधी रशियाने दुसऱ्या महायुद्धात अशा प्रकारे राखीव फौजा बाहेर काढल्या होत्या. त्यानंतर आता पहिल्यांदाच या फौजा रशियाने सीमारेषेवर तैनात केल्या आहेत. त्यामुळे पुढे होऊ घातलेल्या मोठ्या युद्धाचीच ही नांदी असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पुतीन यांनी रशियन वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जर रशियाच्या सीमारेषांना धोका निर्माण झाला, तर आम्ही रशिया आणि आमच्या नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी उपलब्ध असलेल्या सर्व मार्गांचा वापर करू यात कोणतीही शंका नाही. या फक्त हवेतल्या बाता नाहीत, असे पुतीन म्हणाले. रशियाला उद्ध्वस्त करण्यासाठी पाश्चात्य देश कट कारस्थान करत होते. रशियाविरोधात अण्वस्त्राचा वापर करण्याची योजना देखील आखली जात होती. युरोपियन युनियन, अमेरिका आणि ब्रिटन युक्रेनला रशियामध्ये लष्करी कारवाई करण्यासाठी उद्युक्त करत आहेत, असा दावा पुतीन यांनी केला आहे.
(हेही वाचा सत्ता संघर्षाची सुनावणी लाईव्ह दिसणार?)
Join Our WhatsApp Community