केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बौठकीत आज, बुधवारी आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला चालना देण्यासाठी 3 निर्णय घेण्यात आले. ज्यामध्ये उच्च कार्यक्षमता सोलर पीव्ही मॉड्यूल ट्रान्स-2 साठी पीएलआय योजनेला मंजुरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यासोबतच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रीय लॉजिस्टिक पॉलिसीलादेखील मंजूरी देण्यात आली असून, ज्याचे नुकतेच पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते.
(हेही वाचा – धारावी पुनर्विकासासाठी पुन्हा नव्याने निविदा काढणार; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय)
यावेळी ठाकूर म्हणाले की, उच्च कार्यक्षमता सोलर पीव्ही मॉड्यूल ट्रान्स-2 साठी पीएलआय योजनेसाठी 19 हजार 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पीएलआय योजना 14 भागात आणली जाणार आहे. या योजनेमुळे देशात सौर पॅनेलच्या निर्मितीला चालना मिळणार आहे. याशिवाय बैठकीत मंत्रिमंडळाने सेमीकंडक्टर्स आणि डिस्प्ले मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टमच्या विकासासाठी कार्यक्रमातील सुधारणांनाही मंजुरी दिल्याचे ठाकूर यांनी सांगितले. या अंतर्गत सेमीकंडक्टर उत्पादन युनिट्सना तंत्रज्ञान नोड्स तसेच संयुक्त सेमीकंडक्टर, पॅकेजिंग आणि इतर सेमीकंडक्टर सुविधांसाठी 50 टक्के प्रोत्साहन राशी दिली जाणार आहे. यामुळे 2 लाख लोकांना प्रत्यक्ष आणि 8 लाख लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळण्यास मदत होणार आहे.
यासोबतच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रीय लॉजिस्टिक पॉलिसी मंजूर करण्यात आली. लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स रँकिंग सुधारणे आणि 2030 पर्यंत टॉप 25 देशांमध्ये स्थान मिळवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. याद्वारे, देशभरात उत्पादनांच्या निर्बाध वाहतुकीला प्रोत्साहन देऊन वाहतुकीशी संबंधित खर्चात कपात करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community