मुंबई महापालिकेच्या निवडणुकीआधी द्विधा मनस्थितीत असलेल्या शिवसैनिकांमध्ये उत्साह भरण्यासाठी उद्धव ठाकरे गटाने गोरेगाव येथील नेस्कोच्या मैदानावर शिवसैनिकाच्या गटप्रमुखांचा मेळावा आयोजित केला होता. त्या मेळाव्याला शिवसेनेचे नेते गजानन कीर्तिकर हे प्रकृती अस्वास्थ्य असूनही मेळव्याच्या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यावेळी बोलताना कीर्तिकर यांनी चक्क शिंदे यांनी केलेली युती नैसर्गिक आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे गटाला घराचा अहेर दिला.
आता समेट करा
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदार फोडून भाजपाशी युती करून सत्ता स्थापन केली. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. यात उद्धव ठाकरे यांचा गट कमकुवत बनला आहे. त्यातच मुंबई महापालिकेची निवडणूक आली आहे. अशा वेळी मुंबईवर मागील २५ वर्षे सत्ता असलेल्या शिवसेनेची सत्ता जाईल का, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाने तातडीने गटप्रमुखांचा मेळावा घेतला. त्यामध्ये जेष्ठ शिवसैनिक, नेते गजानन कीर्तिकर हेही उपस्थित होते. त्यावेळी बोलताना खासदार कीर्तिकर म्हणाले की, मी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो. त्यांना मी म्हटले की, आता समेट करा. किती वर्षे हे भांडण चालणार? २-३ वर्षे तुम्ही एकमेकांची डोकी फोडणार, त्यापेक्षा समेट करा. एकत्र येऊया. शिंदेंनी जी युती केली आहे ती नैसर्गिक आहे. २०१९च्या निवडणुकीत युती करूनच निवडणूक लढलो होतो आणि पुढची वाटचाल राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत होता कामा नये, हे आमचे ठाम म्हणणे आजदेखील आहे, असेही नेते कीर्तिकर म्हणाले.
(हेही वाचा संजय राऊत जेलमध्ये पण ठाकरे गटाच्या मनामध्ये, उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यात राऊतांसाठी राखीव खुर्ची)
Join Our WhatsApp Community