शिंदे यांनी असं काय केलं जे बाळासाहेब, उद्धव आणि आदित्यला जमलं नाही, वाचा…

175

शिवसेनेच्या गटनेत्यांचा मेळावा बुधवारी मुंबईतील गोरेगावमधील नेस्कोच्या प्रांगणात पार पडला. पण त्याचवेळेला शिंदे गटाच्या बाळासाहेब शिवसेनेच्यावतीने दिल्लीत शिवसेना राज्यप्रमुखांचाही मेळावा पार पडत होता. शिवसेनेच्या स्थापनेपासून कधीही मुंबई आणि महाराष्ट्राबाहेर शिवसेनेच्या राज्यप्रमुखांचा मेळावा आजवर पार पडलेला नाही. पण अशाप्रकारे राज्याबाहेर मेळावा घेऊन खरी शिवसेना आपलीच आहे, हे सांगणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची ताकद राज्याबाहेरही मोठ्या प्रमाणात  मजबूत करण्याचा निर्धार केला. मात्र, अशाप्रकारे राज्याबाहेर विविध राज्यांच्या प्रमुखांचा मेळावा घेऊन शिंदे यांनी एकप्रकारे शिवसेनेच्या वाटचालीत नवीन इतिहास रचत, जे आजवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना जमले नाही, ते काम एकनाथ शिंदे यांनी करून दाखवले आहे, अशीच प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे.

बाळासाहेब शिवसेना गट अर्थात शिंदे गटाच्यावतीने बुधवारी दिल्लीमध्ये देशातील विविध शिवसेना राज्यप्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. दिल्लीत आजवर शिवसेनेच्या कोणत्याही विविध राज्यांच्या प्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला नव्हता. तसेच अशाप्रकारे सर्व राज्यप्रमुखांचा मुंबईत किंवा मुंबईबाहेर राज्यात मेळावा शिवसेनेने आयोजित केला नव्हता. त्यामुळे शिवसेनेच्या बुधवारी आयोजित केलेल्या विविध राज्यप्रमुखांच्या मेळाव्याची नोंद शिवसेनेच्या आजवरच्या वाटचालीत ऐतिहासिक अशी नोंद होण्यासारखी आहे.

( हेही वाचा: टेरर फंडिंगप्रकरणी महाराष्ट्रात 20 ठिकाणी NIA चे छापे; पुणे,नवी मुंबई, भिवंडीत धाडी )

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मेळाव्याच्या प्रारंभी बोलताना ‘जय महाराष्ट्र’ म्हणत साद घातली. दिल्लीत जाऊन ‘जय महाराष्ट्र’ बोलण्याची हिंमत दाखवतानाच त्यांनी ‘हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे’ यांचे विचार पुढे नेण्यासाठी विविध राज्यातील प्रमुखांनी स्थानिक भूमिपुत्रांच्या न्याय्यहक्कासाठी लढण्याचे आवाहन करत देशात शिवसेना अधिक मजबूत करण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे यांचा आदर्श पुढे नेण्याचे आवाहन केले आहे. राज्यात आम्ही मुख्यमंत्री आहोत, देशातही आमचे सरकार आहे. त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांचे मुद्दे पुढे आणा. आपल्याला सर्व प्रकारची मदत मिळेल,असे सांगत त्यांनी राज्यप्रमुखांना स्थानिक भूमिपुत्रांच्या मुद्दयावरून आक्रमक होण्याच्याही सूचना केल्या आहेत.

आजवर शिवसेनेच्या राज्यप्रमुखांना मातोश्रीवर साधी भेट सोडा साधा फोनही केला जात नव्हता, पण शिंदे यांनी सर्व राज्यप्रमुखांना आपल्यासोबत एकत्र आणताना त्यांच्याशी संवाद साधलाच. तसेच, दिल्लीत या मेळाव्यात बोलताना प्रत्येक राज्यातील प्रमुखांच्या नावांचा भाषणात उल्लेख करत त्यांनी आपला सर्वांशीच संवाद होत असल्याचेही दाखवून दिले. त्यामुळे राज्याच्या प्रमुखांना जे प्रेम ठाकरे कुटुंबांकडून मिळत नव्हते, ते प्रेम शिंदे यांच्याकडून मिळत असल्याने, नेस्को येथील गटप्रमुखांच्या मेळाव्याला उपस्थित असलेले विविध राज्यप्रमुख आणि शिंदे यांच्या मेळाव्यातील राज्यप्रमुखांची उपस्थिती यावरून राज्यप्रमुख हे शिंदे आणि उध्दव ठाकरे यांच्याशी किती मनाने जवळ आहेत, याचीही साक्ष पटत होती.

आजवर शिवसेनेने मुंबई आणि देशाबाहेर शिवसेनेची वाढ होऊ दिली नाही. गुजरात, उत्तरप्रदेश आदी राज्यांमध्ये शिवसेनेने राज्यप्रमुखांची नियुक्ती केली असली तरी संघटनात्मक वाढीसाठी कोणतेही प्रयत्न केले नाही. परंतु शिंदे यांनी विविध राज्यप्रमुखांच्याद्वारे शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढण्यासाठी दोन राज्यांसाठी एक खासदार, तसेच आमदार आणि मंत्र्यांवरही जबाबदारी टाकली जाईल,असे सांगून राज्यप्रमुखांशी समन्वय राखण्याचा प्रयत्न राहिल,असे स्पष्ट केले. त्यामुळे केवळ नियुक्ती करून थांबणार नाही, तर शिवसेनेचे खासदार,आमदार आणि मंत्रीही आपल्यासोबत असतील असाही विश्वास त्यांना दिला. त्यामुळे शिवसेनेची ताकद मुंबई आणि राज्याबाहेर मजबूत करण्याचे काम जे ठाकरे कुटुंबाला जमले नाही ते काम शिंदे यांनी करून दाखवायला निघाले असून, देशाच्या राजधानीत राज्यप्रमुखांचा मेळावा घेऊन ठाकरेंच्याही एक पाऊल टाकत, जे त्यांना जमले नाही ते शिंदे यांनी करून दाखवले,अशाच काहीशी प्रतिक्रिया ऐकायला  मिळत आहेत.

शिवसेना ही शिवसैनिकांच्या घामातून आणि रक्तातून मोठी झाली आहे. इथे कुणी नोकर नाही. शिवसेना ही काही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांचा, शिवसैनिकांचा सन्मान व्हायलाच पाहिजे, सांगताना शिंदे यांनी आपल्या शिवसेनेत सर्वांचा सन्मान राखला जाईल,असाही विश्वास दिला.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.