बोरिवलीच्या नेशनल पार्कमधील ‘वनराणी’ रेल्वे गेल्या काही वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. तिची जागा आता अत्याधुनिक मिनी ट्रेन घेणार असून, पालिका निवडणुकीआधी ही सेवा कार्यान्वित करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.
मुंबईकरांना जंगल सफरीचा आल्हाददायक आनंद देणारी नॅशनल पार्कमधील वनराणी रेल्वे गेल्या काही वर्षांपासून बंद अवस्थेत असल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात होती. ही बाब लक्षात घेऊन नव्या सरकारने मिनी ट्रेनची सुविधा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी त्यासंदर्भातील घोषणा केली. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना, देशातील सर्वोत्तम ट्रेन या उद्यानात आणली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
घोषणेनंतर मुनगंटीवार यांनी तत्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कामाला लावले असून, नॅशनल पार्कमधील मिनी ट्रेनबाबत तातडीने प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई पालिका निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी ही ट्रेन सुरू होईल, यादृष्टीने नियोजन करा, विहित वेळेत प्रस्ताव अर्थ विभागाकडे पाठवा, मंजुरीसाठी पाठपुरावा करा, अशा सूचना वनमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना केल्याचे समजते.
वन संवर्धनासाठी आराखडा
- उद्यानात येणाऱ्या लहान मुलांसह प्रत्येकाला अशा ट्रेनचे आकर्षण असते. ही ट्रेन सर्व कुटुंबाला एकत्र बांधून ठेवण्याचे आणि चेहऱ्यावर हसू आणण्याचे काम करत असल्याने या उद्यानात ट्रेन आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी घोषणा सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
- ज्याप्रमाणे शहरांच्या विकासासाठी विकास आराखडा असतो त्याचप्रमाणे वन विभागामार्फत वन संरक्षण व संवर्धनासाठी आराखडा तयार करण्यात येणार आहे. उद्याने आपली मुक्त विद्यापीठे असून आनंद आणि ऊर्जा देणारी असल्याने या वनराईचे महत्त्व प्रत्येकाला पटवून देऊ असेही त्यांनी सांगितले.