मुले पळवणाऱ्या टोळ्यांच्या अफवांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण

135
‘मुले पळवणाऱ्या टोळ्या सक्रिय असून अमुक शाळेतून अमुक ठिकाणाहून अमुक मुलं चोरीला गेलं आहे’ या प्रकारच्या अफवा मुंबई , ठाणे नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात पसरवल्या जात आहेत. या अफवांमुळे पालक वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, या अफवांचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल करून अनेकजण या अफवांना खतपाणी घालत असल्याचे समोर आले आहे. या अफवांना पोलीस यंत्रणेने गंभीरपणे घेतले असून हे मेसेजेस कुठून येत आहेत तसेच कुठल्याही प्रकराची खातरजमा न करता मेसेजस व्हायरल करणाऱ्यांवरदेखील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर या संदर्भात व्हायरल होणारे व्हिडीओ, ऑडिओ कुठून प्रसारित केले गेले याचा तपास कारण्यासाठी पोलिसांची सायबर यंत्रणा कामाला लागली आहे. या अफवांवर विश्वास ठेवू नये व घाबरुन जाऊ नये असे आव्हान पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आले आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबईत मागील काही आठ्वड्यांपासून मुले पळवणाऱ्या टोळ्यांबाबत सोशल मीडिया तसेच व्हाट्सअॅपवर ऑडिओ आणि व्हिडीओ क्लिप टाकून अफवा पसरवल्या जात आहे. या अफवांची सुरुवात सर्वात प्रथम ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा या शहरातून सुरुवात झाली असल्याची माहिती समोर येत आहे. मुंब्रा येथे या अफवांमुळे दोन निष्पाप महिलांना जमावाच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. या दोन महिलांना स्थानिकांनी पकडून मारहाण केल्याचा व्हिडीओ मुंब्रा येथील व्हाट्सअॅप ग्रुपवर व्हायरल करण्यात आला होता. दरम्यान येथील व्हाट्सअॅप ग्रुपवर तीन वेगवेगळ्या ऑडिओ क्लिप व्हायरल करण्यात आल्या होत्या, या अफवाचे लोन संपूर्ण ठाणे जिल्हा, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई आणि मुंबईतील उपनगरात पसरले आहे.
या अफवांच्या भीतीने पालक वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. या अफवांची चर्चा महिला वर्गात मोठ्या प्रमाणात असून लोकल ट्रेन, शाळेच्या आवारात, बाजारात भेटणाऱ्या महिलांमध्ये या अफवांवर चर्चा केली जात आहे. अनेकाकांकडून व्हायरल मेसेजेसची खात्री न करता ते पुन्हा दुसऱ्या ग्रुपमध्ये टाकले जात असल्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. या अफवांना पोलीस यंत्रणेने गांभीर्याने घेतले असून अफवा पसरवणाऱ्यांवर सायबर विभागाकडून लक्ष ठेवले जात आहे. मुले चोरीला गेल्याची नोंद कुठल्याही पोलीस ठाण्यात नसून तसेच मुलांना पळवणारी कुठलीही टोळी पोलिसांनी पकडली नाही असे पोलीसांकडून स्पष्ट करण्यात आले असून ही केवळ अफवा असून या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये किंवा घाबरू नये मात्र काळजी घ्यावी असे आवाहन मुंबई, ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिका-यांकडून करण्यात येत आहे.

या अफवांचे उगमस्थान शोधून काढण्यासाठी, तसेच व्हायरल होणारे व्हीडिओ, ऑडिओ कुठे बनवण्यात आले व कुठले आहेत याचा तपास करण्यासाठी सायबर तज्ज्ञांची मदत घेतली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तसेच या अफवा पसरवण्यामागे समाजकंटकांचा काय हेतू आहे याचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या अफवांचे पीक कल्याण डोंबिवली शहरात मोठ्या प्रमाणात पसरले आहे. येथील शाळांचे नाव टाकून मेसेजस व्हायरल केले जात आहेत. या मेसेजसला काही जणांकडून खतपाणी घातले जात असून, यासंदर्भात कुठलीही शहानिशा न करता मेसेज ग्रुपमध्ये व्हायरल केले जात असल्याचे समोर आले आहे. याबाबत येथील परिमंडळ ३ पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्याकडे विचारणा केली असता कल्याण डोंबिवलीतील पोलीस ठाण्यांमध्ये या प्रकारची कुठलीही घटना घडलेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे, तसेच या केवळ अफवा असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र काळजी घ्यावी असे आवाहन पोलीस उपायुक्त गुंजाळ यांनी केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.