RSS प्रमुखांनी घेतली मुस्लिम संघटनेच्या नेत्यांची भेट, बंद खोलीत तासभर चर्चा

146

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज गुरुवारी अखिल भारतीय मुस्लिम इमाम संघटनेचे प्रमुख इमाम उमर अहमद इलियासी यांच्यासह अन्य मुस्लिम नेत्यांची भेट घेतली. दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्गावरील मशिदीत जाऊन डॉ. भागवत यांनी सुमारे तासभर या नेत्यांशी बंद खोलीत चर्चा केल्याची माहिती मिळत आहे.

(हेही वाचा – माझे कुटुंब माझी जबाबदारी, उद्धव ठाकरेंना कुटुंबाशिवाय कोणीच दिसत नाही!)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने समाजातील सर्व स्तरातील लोकांना जोडण्याच्या उद्देशाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी इमाम उमर अहमद इलियासी आणि अन्य मुस्लीम नेत्यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी संघाचे सरसरकार्यवाह कृष्ण गोपाल, रामलाल आणि भारतीय मुस्लीम मंचचे संयोजक इंद्रेश कुमारही उपस्थित होते.

यापूर्वी, माजी मुख्य निवडणूक आयुक्त एसवाय कुरेशी आणि दिल्लीचे माजी उपराज्यपाल नजीब जंग यांच्यासह मुस्लिम विचारवंतांच्या 5 सदस्यीय गटाने 22 ऑगस्ट रोजी भागवत यांची भेट घेतली होती. ही बैठक सुमारे 2 तास चालली होती. या बैठकीत देशातील जातीय सलोखा मजबूत करणं आणि हिंदू-मुस्लिम यांच्यातील वाढतं अंतर कमी करणं यावर भर देण्यात आला होता. मोहन भागवत यांची एका महिन्यात मुस्लिम विचारवंतांसोबतची ही दुसरी बैठक आहे. यासंदर्भात अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी सांगितले की, सरसंघचालक सर्व स्तरातील लोकांना भेटतात. हा सातत्याने चालणारा सामान्य संवाद प्रक्रियेचा भाग आहे. यामागे कुठला विशिष्ट हेतू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.