मुंबईमध्ये ठाकरे गटाच्या गट प्रमुखांचा मेळावा झाला. त्यानंतर दिल्लीत शिंदे गटाच्या राज्य प्रमुखांचा मेळावा झाला. या दोन्ही मेळाव्यांमधला महत्वाचा फरक म्हणजे टोमणे आणि टोले असा होता. उद्धव ठाकरेंनी नेहमीप्रमाणे टोमणे मारले आणि शिंदेंनी टोलेबाजी केली. उद्धव ठाकरेंचं एकंदर भाषण पाहता त्यांनी शिवसैनिकांच्या दृष्टीकोनातून चांगलं भाषण केलं. अर्थात नेहमीप्रमाणे संदर्भहीन व भरकटलेले मुद्दे होतेच. तरी ठाकरेंच्या शिवसैनिकांना संदर्भाशी घेणं-देणं नसतं. त्यांना फक्त धडाकेबाज भाषण आवडतं. म्हणून मी म्हटलं की शिवसैनिकांच्या दृष्टीकोनातून हे चांगलं भाषण होतं.
( हेही वाचा : गुजरातची निवडणूक सत्तेसाठी नव्हे तर विरोधी बाकावर बसण्यासाठी लढवली जाणार आहे)
भाषणात हिंदुत्वाचा मुद्दा उचलत त्यांनी शेवटी मुस्लिमांची देखील पाठराखण केली. एरव्ही परप्रांतीय म्हणून ज्यांना हिणवलं त्यांना देखील सामावून घेण्यात आलं. कारण आता मुंबई पालिकेची निवडणूक जवळ आलीय. त्यामुळे ठाकरेंना आता मुस्लिम आणि अमराठी लोकांची मते देखील हवी आहेत. भाषणाच्या शेवटी या मतदारांना जरी साद घातली असली तरी सबंध भाषणात गद्दार प्रकारचे तेच तेच मुद्दे होते. कुत्रा आणि गोचिडचा संदर्भ त्यांनी दिला. गोचिड शिंदे गट आहे असं त्यांना म्हणायचं होतं. पण कुत्रा कोण आहे? आणि कार्यकर्ते काय कुत्रे असतात का? शिवसैनिकांनी दर्ग्याचं रक्षण केलं, असं ते म्हणाले. त्यांच्या दाव्यानुसार फक्त शिवसैनिक हिंदुंचं रक्षण करत होते, म्हणून मुस्लिमांना मारण्यात शिवसैनिकांना हात होता असा त्याचा अर्थ होतो. मग दर्गे कोणी उध्वस्त केले? शिवसैनिकांनीच? आणि शिवसैनिकांनीच वाचवले का? म्हणजे हा शिवसेनेचा कट होता का की, दर्ग्यांवर हल्ले करायचे आणि आपण वाचवायचं. जेणेकरून आपल्याला मसीहा होता येईल? असे अनेक विचित्र मुद्दे ठाकरेंनी यावेळी मांडले.
ठाकरेंच्या शिवसैनिकांना असले लॉजिकल प्रश्न पडणार नाहीत. पण जमलेले लोक आणि सोशल मीडियावर ठाकरेंची बाजू घेणारे लोक इतकेच मतदार ठाकरेंकडे शिल्लक आहेत का? इतर मतदारांसाठी कधीही भाषण करावसं वाटत नाही का? ठाकरेंची ही मूळ समस्या आहे की ते काहीही बोलतात आणि नंतर सारवासारव करायला जातात. आधी गुजरात्यांना, जैन बंधूंना शिव्या घालायच्या आणि निवडणूक आली की त्यांच्याबद्दल आपुलकी दाखवायची? असे प्रकार करुन मतदार भुलणार आहेत असं ठाकरेंना का बरं वाटतं? संभाजी ब्रिगेडशी युती करण्याची घाई असो किंवा भाजपला सोडून जाण्याची घटना असो. बाळासाहेबांचे सुपुत्र कन्फ्युज्ड आहेत. त्यांना नेमकं काय करावं हे कळत नाही. जे समोर येतं ते करत जातात. आता जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, म्हणून काय उपयोग. संभाजी ब्रिगेड म्हणजे हिंदू द्वेष हे स्पष्ट आहे. हिंदूंना इतकं कळतं. त्यामुळे उद्धव ठाकरेंना स्पष्ट भूमिका घ्यावी लागेल, थोतांड सेक्युलरिज्म हवंय की शिवरायांचं हिंदुत्व हवंय.
उद्धव ठाकरेंना मुंबई महानगरपालिका कोणत्याही परिस्थितीत जिंकायची आहे. त्यामुळे मुंबई तोडण्याचा डाव हे मुद्दे पुन्हा आणले जात आहेत. पण ज्यावेळी भाजप ठाकरेंबरोबर होता त्यावेळी अमराठी लोकांची मते ठाकरेंना मिळत होती. आता बाळासाहेब राहिले नाही आणि भाजपची साथ देखील सोडली आहे. त्यामुळे अमराठी लोकांची मते ठाकरेंना मिळणार नाहीत. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे स्वार्थी आहेत. ते स्वतःचाच फायदा बघणार. उद्धव ठाकरे यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तुम्ही जरी ठाकरे गटाचे नेते असलात तरी तेवढेच लोक तुमचे मतदार नसतात. कार्यकर्ता नसलेला, कधीही कार्यालयात न गेलेला, थेट समर्थन न करणारा सामान्य माणूस देखील आपला मतदार असतो.
Join Our WhatsApp Community