राज्यातील पोलिसांसाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. पोलिसांना त्यांच्या कामाच्या ठिकाणापासून जवळच घर मिळावे यासाठी राज्य सरकारकडून आता प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्यातील विविध वाहतूक सेवांच्या अतिरिक्त जागांवर पोलिसांसाठी निवासस्थाने बांधण्याचे प्रस्तावित असून यावर लवकरच समितीच्या माध्यमातून निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
कामाच्या ठिकाणापासून जवळच निवासस्थान
राज्यातील मेट्रो स्टेशन्स,एसटी डेपो,बेस्ट,एनएमएमटी,टीएमटी,पीएमटीसारख्या शहर वाहतूक प्राधिकरणांचे डेपो विकसित करुन तेथील अतिरिक्त जागेवर पोलिसांसाठी सेवा निवासस्थाने बांधण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या जागांवर किती निवासस्थाने बांधता येतील याचा अभ्यास करण्यासाठी गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच पोलिसांना कामाच्या ठिकाणापासून जवळच निवासस्थान मिळणे शक्य होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
(हेही वाचाः 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना राज्य सरकारची थेट नोकरीची हमी, टाटा सामाजिक संस्थेसोबत करार! कशी आहे योजना)
समितीची स्थापना करण्याचा निर्णय
सध्या पोलिसांसाठी शासकीय निवासस्थानांची राज्यात कमतरता आहे. यामुळे पोलिसांना तासन् तास लांबचा प्रवास करुन कामाच्या ठिकाणी यावे लागते. यामुळे त्यांना अधिकचे श्रम होतात. तसेच त्यांच्या कामाच्या वेळा या अनिश्चित असल्याने लांबचा प्रवास करताना त्यांना अनेकदा शारीरिक व्याधींचा देखील सामना करावा लागतो. त्यामुळे पोलिसांना कामाच्या ठिकाणापासून जवळच घरे देण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 27 जुलै रोजी बैठक पार पडली होती. या बैठकीत समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला आहे.
यांचा समितीत समावेश
या समितीमध्ये गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव,राज्याचे पोलिस महासंचालक,मुंबई पोलिस आयुक्त,गृह विभागाचे प्रधान सचिव आणि एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांचा समावेश करण्यात आला आहे.
(हेही वाचाः महिंद्रा फायनान्सवर आरबीआयची मोठी कारवाई, आता करता येणार नाही ‘हे’ काम)
Join Our WhatsApp Community