लेबनानहून स्थलांतरितांना घेऊन जाणारी बोट सीरीया किनारपट्टीवर बुडाली, 34 जणांचा मृत्यू

135

लेबनानमधून स्थलांतरितांना घेऊन जाणारी एक बोट सीरियाच्या किनारपट्टीवर बुडाली. या अपघातात 34 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 14 जणांना वाचवण्यात यश आले आहे.. सीरियाच्या वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, टार्टोस येथील बासेल रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगळवारी लेबनानच्या उत्तर मिनेह प्रदेशातून स्थलांतरितांची एक बोट 120 ते 150 लोकांना घेऊन निघाली होती.

(हेही वाचा – PFI विरोधातील कारवाईला हिंसक वळण; वाहनांची तोडफोड, भाजप कार्यालयावर हल्ला)

रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, सीरियन बंदराचे महासंचालक समीर कुब्रुस्ली यांनी सांगितले की, गुरुवारी संध्याकाळपर्यंत अधिकाऱ्यांना 34 मृतदेह सापडले आहेत. तर 14 जणांना वाचवण्यात यश आले आहे. यासोबतच बोटीवरील सर्व लोक उत्तर लेबनानमधून पलायन करत असल्याचा अंदाज अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. तर लेबनानशिवाय सीरिया आणि पॅलेस्टाईनमधील निर्वासितांचाही या बोटीत समावेश आहे.

सीरियाच्या वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, टार्टोसच्या किनाऱ्यावरील अरवाड या छोट्या बंदराच्या संचालकाने दुपारी साडेचार वाजता अपघाताची माहिती दिली. यानंतर मंत्रालयाने एक जहाज घटनास्थळी पाठवले. यावेळी त्यांना प्रथम एका मुलाचा मृतदेह दिसल्याचे सांगितले जात आहे. यानंतर एकामागून एक मृतदेह मिळू लागले. अरवाडजवळ बरेच मृतदेह सापडल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

लेबनानची लोकसंख्या सहा दशलक्ष आहे. ज्यात एक दशलक्ष सीरियन निर्वासितांचा समावेश आहे. लेबनान २०१९ च्या अखेरीपासून गंभीर आर्थिक मंदीच्या संकटात सापडला आहे. तीन-चतुर्थांश लोकसंख्या गरिबीच्या उंबरठ्यावर आहे. एप्रिलमध्येही अशीच घटना घडली होती. डझनभर लेबनीज, सीरियन आणि पॅलेस्टाईन लेबनीज नौदलाशी चकमक झाल्यानंतर समुद्रमार्गे इटलीला पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान, एकूण 6 मिलीयन सीरियन लोकांपैकी 1 मिलियन सिरीयन बेकायदेशिरपणे युरोपमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करतात. याच प्रयत्नात एप्रिलमध्ये, लेबनीज नौदलाने पाठलाग केलेली गर्दीने भरलेली स्थलांतरित बोट लेबनानच्या त्रिपोलीच्या उत्तरेकडील किनारपट्टीवर बुडाल्याने सहा जणांचा मृत्यू होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.