अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे शहरात राहणाऱ्या एका पंधरा ते सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचे घरात जाऊन चाकूच्या धाकावर दोन दिवसांपूर्वी अपहरण करण्यात आले होते. पोलिसांकडून अपहरण झालेल्या मुलीचा शोध सुरू होता. दरम्यान शुक्रवारी (दि. 23) पहाटे अडीच ते तीन वाजताच्या सुमारास आरोपी मुलीला घेऊन चांदूर रेल्वे शहरात पोहोचला. त्यावेळी अज्ञात मारेकऱ्यांनी अपहरणकर्त्यावर हल्ला चढवला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. अपहरणकर्त्याविरुद्ध यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल असून तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे.
नईम खान रहमान खान (38, रा. चांदुर रेल्वे) असे मृत आरोपीचे नाव आहे. नईम खानने चांदूर रेल्वे येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीच्या घरात प्रवेश करून 21 सप्टेंबरला दुपारच्या सुमारास त्या मुलीचे अपहरण केले होते. यावेळी त्याच्यासोबत अन्य दोन सहकारीसुद्धा हजर होते. मुलीला घेऊन त्याने एका तवेरा वाहनातून पळ काढला होता. अपहरणानंतर मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार केली. चांदुर रेल्वे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस त्याचा कसून शोध घेत होते. मात्र गुरुवारी रात्री उशिरापर्यंत पोलिसांना तो किंवा अपहरण झालेली मुलगी सापडली नाही. दरम्यान शुक्रवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास एका दुचाकीवर नईम त्याच्या दोन मित्रांसह मुलगी असे चौघे एकाच दुचाकीने अमरावतीवरून चांदूर रेल्वे येथे पोहोचले.
( हेही वाचा: एलपीजी टँकर उलटून १७ तासांनंतरही मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत )
मुलीला सोडताच झाला हल्ला
मुलीला तिच्या घराच्या परिसरात सोडल्यानंतर नईम खानवर अज्ञात मारेकऱ्यांनी हल्ला चढवला. यामध्ये मारेकऱ्यांनी त्याच्यावर चाकूचे घावसुद्धा केले. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. ही माहिती मिळाल्यानंतर चांदूर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आहे. नईमचे मारेकरी अजून सापडले नाहीत. दरम्यान त्याने अल्पवयीन मुलीचे अपहरण केले म्हणून त्याचा खून झाला किंवा अन्य काही कारणाने त्याचा बदला घेण्यात आला. याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झाले नाही. पोलीस त्यादृष्टीने तपास करत आहे.
12 गुन्हे दाखल
चांदूर रेल्वे ठाण्याचे ठाणेदार विलास कुलकर्णी म्हणाले की, मृतक नइम खान याच्यांविरुद्ध खून करणे यासह इतर बारा गुन्ह्याची नोंद आहे. अज्ञातांनी त्याच्यावर हल्ला करून त्याचा खून केला आहे. खुनाचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. आम्ही मारेकऱ्यांचा शोध सुरू केला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community