गटप्रमुखांचा मेळावा : इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीने शिवसैनिक नाराज

167

शिवसेनेचा गोरेगाव येथील गटप्रमुखांचा मेळावा हा केवळ दसरा मेळाव्याच्या चाचपणीसाठीच घेण्यात आल्याची जोरदार चर्चा आता शिवसैनिकांमधून ऐकायला येत आहे. गटप्रमुखांचा मेळावा असल्याने त्यामध्ये शाखाप्रमुख उपस्थित असणे आवश्यक असले तरी या मेळाव्यात शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी उपस्थित असल्याने हा मेळावा फक्त गटप्रमुखांचा की पदाधिकाऱ्यांचा असा प्रश्न शिवसैनिकांकडून केला जातो. गटप्रमुखांचा मेळावा असतानाही सर्व पदाधिकाऱ्यांचाही यात समावेश केल्याने खुद्द गटप्रमुखही नाराज झाल्याचे बोलले जात आहे.

( हेही वाचा : खोटी देयके सादर करून बुडवला कोट्यवधींचा महसूल)

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी गोरेगाव नेस्को येथे फक्त गटप्रमुखांचा मेळावा आयोजित केला होता. शिवसेनेतून ४० आमदार आणि १२ खासदार तसेच नगरसेवकांसह शिंदे गटाची स्वतंत्र स्थापना झाल्यानंतर त्यांनी शिवसेना नेते व उपनेते, विभागप्रमुख व उपविभाग प्रमुख, तसेच शाखाप्रमुख यांची स्वतंत्रपणे बैठका घेऊन त्यांची मते जाणून घेत मार्गदर्शनही केले होते. परंतु शिवसेनेचे तळातील ताकद ही गटप्रमुख असल्याने शिवसेनेची पाळेमुळे असलेल्या गटप्रमुखांचा मेळावा घेऊन ही पाळेमुळे मजबूत आहेत की कमजोर आहेत हे जाणून घेण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन केले होते. या पक्ष फुटीमुळे दसरा मेळाव्यात किती शिवसैनिक उपस्थित राहतील याची चाचपणी करण्यासाठीच गटप्रमुखांचा मेळावा शिवसेनेने आयोजित केल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.

काही शिवसैनिकांमधील खासगीतील चर्चेनुसार, शिवसेनेच्या स्थापनेपासून प्रथम कुठेही तर पक्षप्रमुखांनी गटप्रमुखांचा मेळावा आयोजित केला होता. फक्त गटप्रमुखांचा मेळावा असल्याने आणि पक्षप्रमुखांची भेट होणार म्हणून शिवसैनिक एकप्रकारे आनंदी होते. परंतु गटप्रमुखांच्या मेळाव्यात शाखाप्रमुख हे असायलाच हवे. त्यांची उपस्थिती आम्हाला मान्य आहे. पण त्यांच्यासोबत विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, उपविभाग समन्वय, महिला विभाग संघटक, महिला उपविभाग संघटक आदींचा समावेश का होता,असा सवाल शिवसैनिकांकडून केला जात आहे.

जर यापूर्वीच विभागप्रमुख,उपविभागप्रमुख तसेच इतर पदाधिकाऱ्यांचे स्वतंत्र मेळावे झालेले आहेत, तर मग गटप्रमुखांच्या मेळाव्यात अन्य पदाधिकाऱ्यांना का बोलावले,असा प्रश्न शिवसैनिकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे निव्वळ गटप्रमुखांचा हा मेळावा नसल्याचे खुद्द शिवसैनिक बोलत असून गटप्रमुखांचा मेळावा सांगायचा आणि सर्व पदाधिकाऱ्यांना बोलायचे हे योग्य नसल्याचीही नाराजी त्यांच्यामधून व्यक्त होत आहे. पक्ष फुटीनंतर प्रथमच हा दसरा मेळावा होणार असल्याने गर्दी जमेल की नाही याची चाचपणी करण्यासाठी हा मेळावा घेतला होता का असा प्रश्न उपस्थित होत असतानाच शिवसैनिकांमधील खासगी चर्चेने याला दुजोरा मिळताना दिसत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.