पेडणेकरांना नव्हे तर शिवसैनिकांना ऐकायच आहे अंधारे, ठाकरेंना!

134

शिवसेनेच्या गोरेगाव येथील गटनेत्यांच्या मेळाव्यामध्ये माजी महापौर आणि शिवसेनेच्या नवनियुक्त उपनेत्या किशोरी पेडणेकर यांच्या भाषणावर शिवसैनिक काहीसे नाराज असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेत नव्याने प्रवेश केलेल्या आणि पक्षाच्या उपनेते पदी नियुक्ती झालेल्या सुषमा अंधारे यांचे भाषण ऐकण्याची तीव्र इच्छा गटनेत्यांची होती. परंतु अंधारे यांच्यासारख्या हुशार वक्त्या असताना या व्यासपीठावर भाषण करण्याची संधी न देता पेडणेकर यांना भाषण करण्याचा सन्मान पक्षाने दिल्याने ही काहीशी नाराजी असल्याचे बोलले जात आहे. पेडणेकर यांचं भाषण तर व्हायलाच हवे, पण त्यांच्यासारख्या हुशार आणि अभ्यासू व्यक्तिमत्व असलेल्या अंधारे यांचे मार्गदर्शनही तेवढेच आमच्यासाठी मोलाचे होते अशी प्रतिक्रिया आता शिवसैनिक व्यक्त करू लागले आहे.

( हेही वाचा : उत्तराखंडमध्ये लिपुलेख राष्ट्रीय महामार्गावर भूस्खलन, ४० प्रवासी अडकल्याची शक्यता)

शिवसेनेच्या सर्व गटप्रमुखांचा मेळावा हा गोरेगाव नेस्को येथील प्रांगणात दोन दिवसांपूर्वी संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं मार्गदर्शन झालं. याबरोबरच शिवसेनेचे शिवसेनेचे नेते आणि अन्य पदाधिकाऱ्यांचेही भाषणं झाली. या व्यासपीठावर महिला म्हणून माजी महापौर आणि नवनियुक्त उपनेत्या किशोरी पेडणेकर यांना मार्गदर्शन करण्याची संधी देण्यात आली. मात्र या मार्गदर्शन पर भाषणात त्यांनी गटप्रमुखांना कशाप्रकारे आज पुढे जाण्याची गरज आहे, हे न सांगता केवळ विरोधकांवरती टीका आणि टिप्पणी केली. तसेच नेत्यांची ओळख करताना जी त्यांच्या नावापुढे विविध बिरुदे लावली, त्यामुळे त्यांच्या भाषणाबाबत अनेक सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. या मेळाव्यातील भाषणाच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांमधून आता कुजबूज बाहेर ऐकायला यायला लागली आहे. शिवसेनेकडे अनेक उपनेते आहेत. मात्र पेडणेकर यांनी आपल्या वायफळ बडबडीने आपल्या अज्ञानाचे दर्शन घडवत आपले आणि पक्षाचे हसे करून घेतले. त्यामुळे पेडणेकर यांना मोठ्या व्यासपीठावर भाषण करण्याची संधी देण्यापूर्वी पक्षाने नवनियुक्त उपनेत्या सुषमा अंधारे किंवा ज्योती ठाकरे यांना भाषण करण्याची संधी द्यायला हवी होती, अशा प्रकारच्या सूर शिवसैनिकांमधून ऐकायला येत आहे. पेडणेकर या जरी आक्रमक असल्या आणि पक्षाच्या प्रवक्त्या तसेच मुंबईच्या माजी महापौर असल्या तरी सुद्धा एक वक्त्या म्हणून त्यांचं नाव तेवढंस प्रभावशाली नाही. त्यामुळे सुषमा अंधारे या त्यात तुलनेत अभ्यासू वक्त्या आहेत. तसा त्यांचा नावलौकिक आहे. सुषमा अंधारे यांनी मागील निवडणुकीत राष्ट्रवादीच्या प्रमुख प्रचारक म्हणून काम केले आहे आणि अनेक सभांमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत सभा मारून नेल्या आहेत. त्यामुळे सहाजिकच अंधारे यांच्या बद्दल शिवसैनिकांमध्ये एक आदरयुक्त भावना निर्माण होताना दिसत आहे. विशेष म्हणजे आजच्या घडीला विरोधकांवर समाचार घेताना आपल्या अभ्यासू वृत्तीने शब्दांची फेक त्या ज्याप्रकारे भाषण करतात ते शिवसैनिकांना आज अभिप्रेत होतं किंबहुना ते ऐकायचं होतं,अशा प्रकारची भावना शिवसैनिकांमध्ये आहे. अंधारे या बाहेरून आल्या असल्या तरीही एक वक्त्या म्हणून त्यांचं भाषण ऐकणं हे शिवसैनिकाला नक्कीच आवडलं असतं. पेडणेकर यांना आपण सातत्याने टीव्ही माध्यमांच्या माध्यमातून ऐकत असतो. त्यामुळे अंधारे यांना ऐकणं निश्चितच आवडत असतं,असं शिवसैनिकांचं म्हणणं आहे. अंधारे यांच्याबरोबर शिवसैनिकांना उपनेत्या ज्योती ठाकरे यांचंही भाषण ऐकायचं होतं. ज्योती ठाकरे या आक्रमक बोलतात आणि त्यांना एक वक्त्याच्या रूपात ऐकायला आवडलं असतं. एक वक्ता म्हणून ज्योती ठाकरे यांचं भाषण अप्रतिम असतं. त्यामुळे गटनेत्यांच्या आणि या पदाधिकाऱ्यांच्या बैठक सभेमध्ये या दोन्ही प्रमुख वक्त्यांची भाषणे ऐकायला मिळाली असती तर निश्चितच शिवसैनिकांचा हा मेळावा परिपूर्ण असा वाटला असता.

दरम्यान या शिवसैनिकांमधील कुजबूजी नंतर आगामी दसऱ्या मेळाव्यामध्ये या दोन्ही नेत्यांपैकी एकाला या व्यासपीठावर बोलण्याची संधी दिली जाणार असल्याची ही माहिती मिळत आहे. सुषमा अंधारे यांच्या भाषण हे तोफ समजली जाते आणि निश्चितच विरोधकांवरती त्या टोकाची टीका करत असतात. विशेष म्हणजे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या भाषणाची जी पोकळी आहे, ती पोकळी अंधारे यांच्या रूपाने भरून काढली जाऊ शकते असे शिवसैनिकांना वाटत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.