शिवसेनेला आता ‘वरुण’राजाच्या कृपेची गरज…

149

पोलीस आणि महापालिकेने शिवसेनेला दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवाजी पार्क) दसरा मेळाव्याकरता परवानगी नाकारल्यानंतर उच्च न्यायालयाने शिवसेनेला मेळाव्याचे आयोजन करण्यासाठी हिरवा दिवा दाखवला. शिवसेनेनेला शिवाजीपार्कवर आपला परंपरागत दसरा मेळावा घेण्यास न्यायदेवतेने परवानगी दिली असली तरी आता सर्वांचे लक्ष आहे ते वरुणराजावर. दसरा मेळाव्या आदल्या दिवशी किंवा त्यादिवशी वरुण राजाची अवकृपा झाल्यास त्याचा परिणाम मेळाव्यावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी पावसामुळे शिवसेनेला आपला दसरा मेळावा रद्द करण्याची वेळ आली होती. त्यामुळे न्यायदेवता प्रसन्न झाली असली तरी वरुण राजा प्रसन्न झाला तरच शिवसेनेचा आवाज शिवाजीपार्कवर दसरा मेळाव्यात घुमलेला दिसेल, असे बोलले जात आहे.

( हेही वाचा : अविश्वास दाखवणा-यांचा आता न्यायालयावरील विश्वास वाढेल; भाजपचा उद्धव ठाकरे गटाला टोला )

शिवसेनेच्यावतीने शिवाजीपार्कवर दसऱ्याला मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. सतत ४० वर्षे एकच नेता, एकच मैदान असलेल्या या दसऱ्या मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून वाजत गाजत, गुलाल उधळत शिवसैनिक मोठ्याप्रमाणात शिवतिर्थावर अर्थात शिवाजी पार्कवर जमा होत असे. बाळासाहेबांनंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे मार्गदर्शन या दसरा मेळाव्यात शिवसैनिकांना होत असते. परंतु यंदा शिवसेनेनेतून ४० आमदार, १२ खासदार आणि नगरसेवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाहेर पडत शिवसेनेचा स्वतंत्र गट स्थापन केला. त्यामुळे खरी शिवसेना कुणाची यावरून ठाकरे आणि शिंदे गटांमध्ये जोरदार वाद सुरु असून सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.

दहिहंडीमध्ये वरळीमध्ये ज्याप्रकारे भाजपकडून झालेला दगा फटका लक्षात घेता आणि आपलीच मूळ शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात असल्याने उध्दव ठाकरे गटाने गणपतीपूर्वीच म्हणजे २२ ऑगस्ट रोजीच महापालिकेकडे शिवाजीपार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी मिळावी म्हणून अर्ज केला होता. परंतु या अर्जावर कोणत्याही प्रकारचा निर्णय महापालिकेने घेतला नाही. त्यातच शिंदे गटाच्यावतीनेही अर्ज करण्यात आल्यानंतर अखेर २२ सप्टेंबर रोजी पोलिसांच्या अहवालाच्या आधारे महापालिकेच्या परिमंडळ दोनचे उपायुक्त रमाकांत बिरादर यांच्या स्वाक्षरीने दोन्ही गटांना मेळाव्यासाठी परवानगी नाकारण्यात आली. दरम्यान, याआधीच न्यायालयात गेलेल्या शिवसेनेच्या याचिकेवर निर्णय देत न्यायालयाने शिवाजीपार्कवर परंपरागत मेळाव्याला परवानगी देण्याचे निर्देश महापालिकेला दिले.त्यामुळे न्यायायातून आता शिवसेनेने परवानगी मिळवल्याने एकच जल्लोषा शुक्रवारी संपूर्ण मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये शिवसैनिकांनी केला.

न्यायदेवतेच्या मंदिरात शिवसेनेला न्याय मिळाला असला तरी आता शिवसेनेला खरी भिती आहे ती वरुण राजाची. यापूर्वी सन २००६ मुसळधार पावसामुळे शिवसेनेला दसरा मेळावा रद्द करण्याची वेळ आली होती. यंदाही पावसाळा थोडासा लांबणीवर पडलेला आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस मुसळधार पावसाची बरसात होत असून नवरात्रौत्सवातही पावसाचे ढग असेच राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे पावसाची हजेरी जर नवरात्रौत्सवात संततधार होत राहिल्यास आणि दसऱ्याच्या आदल्या दिवशी किंवा त्यादिवशी सकाळी मुसळधार पाऊस कोसळल्यास या मेळाव्याच्या तयारीवर पाणी फेरले जावू शकते. त्यामुळे न्यायदेवतेसोबत शिवसेनेवर आता वरुणराजाही प्रसन्न होण्याची गरज असून त्यांची जर अवकृपा झाल्यास शिवसेनेच्या मेळाव्यावर संकट येण्याची भीतीही शिवसेनेच्या नेत्यांना वाटू लागली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.