कर्जबाजारी झालेल्या व्यापाऱ्याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी कुर्ला पश्चिम येथे घडली. याप्रकरणी कुर्ला पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली असून तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र होवाळ यांनी दिली आहे.
कर्जाच्या बोजापायी उचलले पाऊल
अशोक मोहनानी (५०) असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. अशोक मोहनानी हे व्यापारी कुर्ला पश्चिम येथील मॅचेस फॅक्टरी येथे पत्नी आणि मुलीसह राहत होते. कुर्ला पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात त्यांचे अनेक व्यवसाय होते. मात्र कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये नुकसान झाल्यामुळे व्यवसायाची घडी बसत नव्हती, त्यात इतर व्यापाऱ्यांकडून घेतलेल्या कर्जाचा बोजा वाढत चालला होता, व्यापाऱ्याकडून पैशाचा तगादा मागे लागला होता. या नैराश्यातून रविवारी पत्नी मंदिरात गेली असता अशोक मोहनानी यांनी राहत्या घरात सकाळी साडेदहाच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली.
(हेही वाचाः बारा माणसे मारणा-या वाघामुळे चार जिल्ह्यांतील वनाधिकारी हैराण)
व्हिडिओ झाला व्हायरल
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपूर्वी काही व्यापाऱ्यांनी अशोक मोहनानी याचे अपहरण करून एका कार्यालयात डांबून ठेवत त्याचा व्हिडिओ तयार केला. हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आला होता. त्यानंतर अशोकची व्यापारी वर्गात बदनामी झाल्यामुळे काही दिवसांपासून अशोक मोहनानी हे तणावात होते, अशी माहिती समोर येत आहे. या आत्महत्येची नोंद कुर्ला पोलिसांनी केली असून या प्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती कुर्ला पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र होवाळ यांनी दिली.
Join Our WhatsApp Community